काँग्रेस करणार जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम?

24 Jun 2024 11:31:26
 
Congress
 
लोकसभा निवडणूक संपली. निकालही लागला. मात्र, सांगली लोकसभेचा वाद काही केल्या संपताना दिसत नाहीये. लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरु झालेला हा वाद आता निकाल लागल्यानंतर पुन्हा उफाळून आल्याचं दिसतंय. फरक एवढाच की, आता या वादात आणखी एका पाटलांनी एन्ट्री घेतलीये. ते आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम या दोघांनी थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनाच थेट आव्हान दिलंय. त्यामुळे सांगलीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. हा वाद नेमका काय आहे? आणि विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी जयंत पाटलांना कोणतं आव्हान दिलंय? हे जाणून घेऊया.
 
महाविकास आघाडीचं जागावाटप होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करणं असो की, सांगली काँग्रेसकडेच राहिली पाहिजे यासाठी विश्वजीत कदम यांनी केलेल्या दिल्लीवाऱ्या असो, महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक वाद झाला तो सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठीच. काँग्रेसचा पारंपारिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या जागेवर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला उमेदवार उबाठा गट मागे घेईल आणि ही जागा काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी सोडली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण असं काहीच घडलं नाही. अखेर विशाल पाटलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरूद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूकीत विजयही मिळवला. या विजयानंतर आता ते जयंत पाटलांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आयोजित एका सत्कार समारंभात गेले. यावेळी विश्वजित कदमही उपस्थित होते. या सत्कार समारंभात बोलताना त्या दोघांनी थेट जयंत पाटलांनाच आव्हान दिलंय.
 
विश्वजित कदम या कार्यक्रमात म्हणाले की, "काळ बदलला आहे. देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलू लागलं आहे. विशाल पाटील आणि विश्वजित कदम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कसबे-डिग्रसवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या दहा पटीने यापुढे लक्ष देऊ. आता आम्हाला कसलीही पर्वा नाही. कारण सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत," असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांना डिवचल्याचं स्पष्ट झालंय.
 
शिवाय यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, "विश्वजीत कदम आघाडीत असल्याने काही बोलू शकत नाहीत. पण मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करु शकतो. इस्लामपूर मतदारसंघावर खासदार म्हणून आपलं विशेष लक्ष राहणार आहे. या मतदारसंघातील सर्वांची मोट बांधण्याची जबाबदारी माझी आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील गावांमध्ये सत्कार होण्याच्या आधी मी तुमच्या गावाचा सत्कार स्विकारला आहे. यावरुन पुढची दिशा काय राहायला हवी हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आमच्याकडून कुचकं राजकारण होत नाही. आमच्याकडून वर एक खाली एक असं होत नाही. आम्ही जेव्हा निर्णय घेतो तेव्हा सरळ निर्णय घेतो. जे आमच्या मनात आहे तेच तोंडावर असतं. आपल्याला आता याठिकाणी नवीन निर्णय घ्यावे लागतील. कुणाच्यातरी दबावाखाली राहण्याचे दिवस आता संपलेले आहेत," असा इशाराच त्यांनी दिलाय.
 
शिवाय जयंत पाटलांच्या समर्थकांनी एक रील सध्या माध्यमांवर व्हायरल केलीये. "जयंत पाटील गोड बोलतात पण त्यांचा विरोध अजून तुम्ही बघितलेला नाही. मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळंच गमवाल, एवढंच सांगतो," असं या रीलमध्ये म्हटलंय. त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई रंगलीये का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
 
एकेकाळी काँग्रेसचा आणि वसंतदादा पाटील कुटुंबियांचा बाल्लेकिल्ला राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळी काँग्रेसच्या हातून निसटला होता. सांगली लोकसभा मतदारसंघात १९६७ पासुन २०१४ पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच खासदार राहिलाय. यामध्ये स्वतः वसंतदादा पाटील, त्यांचे पुत्र प्रकाशबापु पाटील आणि वसंतदादांचे नातु आणि विशाल पाटलांचे बंधु प्रतिक पाटील यांचाही समावेश आहे. जयंत पाटलांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटलांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वपरिचित आहेच. शिवाय महाविकास आघाडीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी जयंत पाटलांनीच प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
 
दुसरीकडे, विश्वजित कदम हे विशाल पाटलांच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वाद आता विशाल आणि जयंत पाटलांच्या रुपाने पुन्हा एकदा पुढे येतोय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. एकीकडे विशाल पाटील आणि विश्वजित कदम तर दुसरीकडे, जयंत पाटील यांच्यात राजकीय संघर्ष रंगणार का? आणि याचा फटका महाविकास आघाडीला विधानसभेत बसणार का?
 
 
 
Powered By Sangraha 9.0