१०२ कोटी रुपयांच्या जलपर्यटन प्रकल्पाचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्धाटन!

24 Jun 2024 17:00:33
 
Eknath Shinde
 
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी पार पडले. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
"या जलप्रकल्पामुळे भंडारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून देशाच्या नकाशावर येईल. जलपर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. राज्याला ७२० किलोमीटरचा किनारा लाभला असून तिथे अशाप्रकारच्या जल प्रकल्पांना चालना द्यायला मोठा वाव आहे. या परिसराचा विकास होण्यासाठी या प्रकल्पाचा नक्की फायदा होईल," असे मत मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केले.
 
हे वाचलंत का? -  "संजय राऊतांचे ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन!"
 
याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे जलपर्यटन तज्ञ सारंग कुलकर्णी, गोसेखुर्द धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेश धुमने, अधीक्षक अभियंता आर.जी.पाटील, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे नागपूर प्रादेशिक प्रमुख दिनेश कांबळे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "या निवडणूकांमध्ये खोटे नरेटिव्ह पसरवले गेले. पण हे एकदाच होतं. पुन्हा पुन्हा होत नाही. आज महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या असल्या तरी महायूती आणि महाविकास आघाडीला समान मतदान झालेलं आहे. महाविकास आघाडी दररोज सरकारच्या कामावर टीका करते. पण आम्ही त्यांच्या टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देत आहोत," असेही ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0