गडचिरोली पोलिसांनी माओवादाचं कंबरडं मोडलं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

24 Jun 2024 12:14:57

Fadanvis
 
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी माओवादाचं कंबरडं मोडलं असून माओवाद आता संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने शनिवार, २२ जून रोजी पत्नीसह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात आयोजित 'माओवादी आत्मसमर्पण आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नक्षलवादविरोधी अभियानात, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या C-60 दलातील अधिकारी आणि कमांडोंचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. तसेच त्यांनी जिवावर उदार होऊन नक्षलींचा खात्मा करणाऱ्या या 'C-60 यूनिट'चे अभिनंदन केले. C-60 यूनिट आणि गडचिरोली पोलिसांनी सातत्याने शौर्य दाखविले असून महाराष्ट्राला त्या सर्वांचा अभिमान आहे, असे ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गडचिरोली पोलिसांनी सर्वप्रकारे मुकाबला करत माओवादाचं कंबरडं मोडलं आहे. पोलीस हे एक शिस्तबद्ध दल आहे. त्या शिस्तीसोबत जेव्हा एक संवेदना तयार होते, त्यावेळी शिस्त आणि संवेदना मिळून सामान्य माणसाच्या मनात खर्‍या अर्थाने आदराची भावना निर्माण होते. यामुळेच मोठ-मोठ्या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ज्यांच्यावर २५ लाखांचा इनाम होता, आज त्यांनाच शासनाने २५ लाख रुपयांची मदत केली आहे. पोलिसांच्या याच यशामुळे आणि शासनाच्या विविध योजनांमुळे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0