पाकिस्तानमधील दहशतवादाचा संपूर्णपणे नायनाट करण्यासाठी पाकिस्तानने आता नवीन दहशतवादविरोधी कारवाईला सुरुवात केली आहे. होय, आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु चक्क पाकिस्तान आता दहशतवाद संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दहशतवादाचे माहेरघर समजल्या जाणार्या, दहशतवादाला खतपाणी घालणार्या आणि दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली असून त्याला ‘अज्म-ए-इस्तेकाम’ असे सोज्वळ नावदेखील देण्यात आले आहे.
मुळात पाकिस्तान भारताविरोधात समोरासमोर लढू शकत नाही. त्यामुळे लपूनछपून, मागून अशा कुरापती काढून भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी प्रयत्न करतो, हे तर जगजाहीर आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून देशातच दहशतवाद्यांची भरती केली जाते. यामध्ये बेरोजगार सुशिक्षित युवकांचाही मोठ्या संख्येने समावेश असतो. या युवकांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तान जागतिक स्तरावर कितीही दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या गोष्टीला नाकारत असला तरीही पाकिस्तान हेच दहशतवादाचे मूळ आहे, हेच वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानला अशी सुबुद्धी कशी सुचली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, हा निर्णय पाकिस्तानने स्वतः घेतलेला नसून चीनच्या दबावाखाली घेतला असल्याचे बोलले जात आहे.
ज्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा पाकिस्तानचे सरकार दरवर्षी त्यांच्या संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करत असते. त्यामुळे घरात कितीही दुष्काळ असला तरी चालेल, मात्र रक्तरंजित संघर्ष झालाच पाहिजे, अशी स्थिती सध्या पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकताच चीनचा दौरा केला. यावेळी चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सन वेइडोंग यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानने जर्ब-ए-अज्बसारखी मोहीम सुरू करावी, अशी मागणी केली. त्यावेळी पाकिस्तानने ही मागणी फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले.
मात्र, चीनच्या हातातले बाहुले बनलेल्या पाकने चीनच्या या मागणीला नंतर गपगुमान होकार दर्शवला. त्यानुसार पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत ही कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईद्वारे पाकिस्तानी सुरक्षा दल देशातून कट्टरतावाद आणि दहशतवाद उखडून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने आपले सार्वभौमत्व चीनकडे सोपवल्याचे स्पष्ट होते. ही लष्करी कारवाई देशभरात सुरू होणार असून विशेषत: बलुचिस्तान आणि खैबर पख्तून्ख्वावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान भले भारतात लपूनछपून हल्ले करत असला तरीही त्याची झळ पाकिस्तानलाही बसते. याआधी 2014 मध्ये पाकिस्तानने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जर्ब-ए-अज्ब नावाची मोहीम सुरू केली होती. त्याच धर्तीवर ही नवीन मोहीम हाती घेतली जात आहे. या नव्या ऑपरेशनच्या निर्णयाच्या काही दिवसांपूर्वीच चीनने पाकिस्तानवर दबाव आणला होता. पाकिस्तानमध्ये चीनकडून उभारण्यात येत असलेल्या अनेक प्रकल्पांवर बलुच बंडखोरांनी हल्ले केले आहेत. यामुळे चीनची जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. पाकिस्तानमधील चीनचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प याच कारणामुळे बंद पडले आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
बलुच बंडखोर या चिनी प्रकल्पांना त्यांच्या जमिनीवरील कब्जा म्हणून पाहतात. मार्च 2024 मध्ये झालेल्या हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार झाले होते. यानंतर चीन पाकिस्तानवर दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यासाठी सतत दबाव आणत होता. अखेर, या दबावाला बळी पडत पाकने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली आहे. जर हे आधीच झाले असते, तर पाकिस्तानला आपले सार्वभौमत्व चीनकडे गहाण ठेवावे लागले नसते. दरम्यान, पाकिस्तान या मोहिमेच्या नावाखाली पख्तून आणि बलुचांवर अत्याचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या कारवाईवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
पवन बोरस्ते
7058589767