कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांनी मोहम्मद हबीबुल्ला नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. वर्धमान जिल्ह्यातील मीरपारा येथून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. एसटीएफला शनिवार, दि. २२ जून २०२४ संध्याकाळी टाकलेल्या छाप्यात हे यश मिळाले. प्रतिबंधित बांगलादेशी दहशतवादी संघटनेबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद हबीबुल्ला हा वर्धमानच्या एका महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करतो.
मोहम्मद हबीबुल्ला अन्सार-अल-इस्लाम (बांगलादेश) नावाच्या संघटनेशी त्याचे संबंधही समोर आले आहेत. त्याला अन्सारुल्ला बांगला टीम म्हणूनही ओळखले जाते. यूएपीए (अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट) अंतर्गत या प्रकरणात विशेष टास्क फोर्स कार्यरत आहे. त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तो पश्चिम बंगालमधील बांगलादेशी दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलसाठी काम करत होता. त्याला कनकसा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
आसनसोल-दुर्गापूर पोलिस आयुक्तालय आणि एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. पुढील तपासासाठी त्याला कोलकाता येथे पाठवण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी पनागढ परिसरातून आणखी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. शहादत-ए-अल हिकमासोबतचे त्याचे संबंधही समोर येत आहेत. या सर्व संघटना अल कायदाशी संलग्न आहेत.