भावी पंतप्रधान-मुख्यमंत्री

20 Jun 2024 21:37:45
uddhav thackeray political stand


'पुरोगामी महाराष्ट्र’, ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असं म्हणत जातीपातीत वाद पेटले. मराठा, ओबीसी आरक्षणाने वातावरण ढवळले. मग सत्तेत आम्ही नसताना महाराष्ट्र शांत कसा बसेल? ‘अतृप्त आत्मा’ म्हणून मला असा तळतळाट, अस्थिरताच आवडते. आम्ही कोण म्हणजे काय? आम्ही भावी पंतप्रधान आहोत समजलं का? ...तर मेरा सुंदर सपना तुट गया... यावेळीही पंतप्रधानकीपासून दूर राहिलो. तसे लोक म्हणतात की, मी काही पंतप्रधानपदासाठी अजिबात लायक उमेदवार नाही. नसू दे राव. मी नसेन, पण माझी सुकन्या तर आहे ना? हं, आता ती पुढची गोष्ट आहे. तिला आधी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवायचे आहे. काय म्हणता, मग उद्धव कुठे जातील? हे बघा, मी त्यांना एक डाव मुख्यमंत्रिपद दिलं. त्यावेळी काळजावर दगड ठेवला होता. पण, आता तसं नाही. त्यांच्या ‘मशाली’पेक्षा आमच्या ‘तुतारी’ला ‘डिमांड’ जास्त. पाहिजे तर आमच्या संजय राऊतांना विचारा. आमच्यावर त्यांचा जीव आहे. ते सांगतील काय, ते तर आम्हाला महाराष्ट्रात ‘मशाली’पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आता आमची वेळ आहे. गुलाल आमचाच. काय म्हणता? राहुल गांधींच्या काँग्रेसला पण जागा मिळाल्यात. त्या ‘पंजा’ला आमच्या ‘तुतारी’ची साथ होती. त्यामुळे महाराष्ट्रातले काँग्रेसवाले पण आता मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाहीत. आता शर्यतीत पक्त आम्हीच! माझी लेक मुख्यमंत्री आणि मी पुढे 2029 साली पंतप्रधान. शेताच्या पिकाला भाव यायला पाहिजे, तर तिथे शेतकरीच मुख्यमंत्री पाहिजे. वांग्याची शेती करावी तर माझ्या लेकीनेच! शेतीतून करोडो रुपयांची उलाढाल करणारी प्रगत महिला शेतकरी म्हणून तीच आहे. काय म्हणता, संक्रातीला मटण खाणारी आणि ‘पक्ष माझ्या बापाचा आहे’ असं म्हणणारी महिला मुख्यमंत्री नको. आम्हाला काय वेडे समजता? मराठा-ब्राह्मण-ओबीसी-मागासवर्र्गीय भटके विमुक्त-आदिवासी यामध्ये जातपात शोधून उपोषण करणारी, आंदोलनं करणारी आणि इतर वेळी ‘शेतमालाला भाव नाही’ म्हणत अनवाणी पायाने मोर्चा काढणारी, शेतकरी नसणारी ती माणसं काय उगीच पोसलीत? काय म्हणता, तरीही आम्ही तिला मुख्यमंत्री बनवू शकणार नाही. आता पण ‘मेरा सुंदर सपना टूट गया’च होणार? तरीही, मी भावी पंतप्रधान आणि ती भावी मुख्यमंत्रीच असणार, कळलं?

रोहू की कतला?

लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गायी-म्हशी-बैलांचा चारा खाऊन मौज केली. आता नुकतेच लालूपुत्र तेजस्वी यांच्या स्वीय सचिव प्रीतम कुमारचे नाव ‘नीट’ परीक्षेच्या घोटाळ्यात आले आहे. काय म्हणावे, चार्‍याची चव बदलून आता परीक्षेचे पेपरही खाणे सुरू झाले का? राहुल, अखिलेश, तेजस्वी आणि आदित्य या सगळ्यांना पाहिले की वाटते, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले तरी कर्तृत्व आणि गुणवत्ता हे ज्याचे त्याने संपादित करायचे असते.  असो. आता ‘नीट’ पेपरफुटीमध्ये तेजस्वी यादव यांच्या स्वीय सचिवाचे नाव समोर येत आहे. स्वीय सचिव जे भ्रष्टाचाराचे कळस रचत होता, ते तेजस्वी यादव यांना माहिती नव्हते, असे शक्य आहे का? तर असे हे भ्रष्टाचाराचे तार जुळत चालले आहेत. पोहर्‍यात तेच असेल जे आडात आहे. उपमुख्यमंत्रिपद भूषवणार्‍या तेजस्वी यादव यांची कारकीर्द सकारात्मक कामासाठी कधीच उल्लेखनीय नव्हती. बापजाद्यांची मालकी असावी तशी मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पायलटचे प्रशिक्षण घेणारे राहुल गांधी राजकारणात ज्याप्रमाणे आहेत, तसेच क्रिकेटमध्ये रस असलेले तेजस्वी बिहारच्या राजकारणात आहेत. (यावरून काय ते समजावे) तर लालूच्या भ्रष्टाचारी छबीपेक्षा तेजस्वींची छबी जास्त गडद असेल का, हे येणारा भविष्यकाळच सांगेल. राहुल काय किंवा तेजस्वी काय हे दोघेही आपापल्या पूर्वजांच्या नावावर तग धरून आहेत. या दोघांचे देश, समाज याविषयीचे त्यांचे आकलन काय आहे हे तर सर्वश्रुतच, तर जानवेेधारी ब्राह्मण राहुल यांनी तेजस्वी यांना विचारले की, “पार्टीमध्ये रोहू असेल कतला मासा?” यावर तेजस्वी म्हणाले, “कतला मच्छी फ्राय आणि रोहूचा रस्सा असेल.” आपल्याला काय राहुल आणि तेजस्वी यांनी रोहू मासा खाल्ला काय किंवा कतला मासा खाल्ले काय? कष्टकरी आणि होतकरू भारतीयांचा भूतकाळ तर या दोघांच्या बापजाद्यांनी कधीच सुखाचा केला नाही. निदान त्यांचे वारसदार असलेल्या राहुल आणि तेजस्वीने जनतेचा वर्तमान किंवा भूतकाळ तरी खराब करू नये. पण, तशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता. (मी या दोन वारसदारांना ‘गाढव’ म्हंटले, असा कृपया गैरसमज करू नये!)

9594969638
Powered By Sangraha 9.0