विषारी दारूने ३७ जणांचा बळी,१०० रुग्णालयात दाखल!

20 Jun 2024 20:24:20
Kallakurichi liquor death

चेन्नई
: तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवार, दि.19 जून रोजी एका रात्रीत 37 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने या 37 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील जवळपास 100 पेक्षा अधिक जणांना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केले आहे. याव्यतिरिक्त पुदुच्चेरीमध्येही 15 जणांना विषारी दारू प्यायल्याने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयांत दाखल केले आहे. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातून बुधवार, दि. 19 जून रोजी रात्री मोठ्या संख्येने रुग्ण उलट्या आणि इतर तक्रारींसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्याव्यतिरिक्त विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागांतील रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे रुग्ण दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता, त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालय आणि प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी माध्यमांना सदर माहिती दिली.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

रात्रभरात या रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे उपचारांदरम्यान आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यातही अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांची कारवाई, एकाला अटक

या प्रकरणाचा तामिळनाडू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून एका व्यक्तीला अटकदेखील केली आहे. गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी (49) असे त्याचे नाव आहे. बेकायदेशीररित्या दारू गाळून विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल 200 ली. अरकचे कॅनही जप्त केले आहेत. या दारूचे नमुने तातडीने विल्लुपुरम येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये विषारी मिथेनॉलचे मोठे प्रमाण असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

संबंधितांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री स्टॅलिन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी कल्लाकुरीचीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंचे वृत्त ऐकून “मला धक्का बसला असून प्रचंड दु:ख झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, हा प्रकार होण्यासाठी जे कामचुकार अधिकारी कारणीभूत होते, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे,” असे स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0