विस्तारवादी नीतीचा वापर करत असताना, चीन जागतिक स्तरावर सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी नेहमी धडपडत असतो. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका अशा देशांना हाताशी धरून, किंवा कर्जाचे आमिष दाखवून चीन विस्ताराच्या योजना आखत असतो. चीन आता खलिस्तानी फुटिरतावादालादेखील खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
याकरिता चीन चक्क बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर करत आहे, जेणेकरून तो भारताबाहेर राहणार्या खलिस्तानी समर्थकांना एकत्र करू शकेल. यासाठी चीन बॉट्सची मदत घेत होता. मात्र, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने, चीनची चाल ओळखली आहे. मेटाने नुकताच एक फेसबुक अहवाल प्रसिद्ध करत, चीनच्या वाकड्या चाली आणि कारनाम्यांबाबत खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, केवळ खुलासा न करता, मेटाने यावर कारवाईचा बडगादेखील उगारला आहे.
मेटाने आपला 33 पानी ’अॅडव्हर्सरियल थ्रेट रिपोर्ट’ प्रकाशित केला आहे. यामध्ये मेटाने म्हटले आहे की, चीनमधून चालवले जाणारे 37 फेसबुक अकाऊंट, 9 इन्स्टाग्राम अकाऊंट, 13 फेसबुक पेज आणि 5 ग्रुप बंद करण्यात आले आहेत. यापैकी काही पेजचे जवळपास 2 हजार 700 हून अधिक फॉलोअर्स आहेत, काही ग्रुप्सचे 1 हजार, 300 पेक्षा जास्त सदस्य आहेत, तर इन्स्टाग्राम आयडीवर 100 पेक्षा कमी फॉलोअर्स आढळले आहेत.
या विविध खात्यांद्वारे, भारतात तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, पाकिस्तान, नायजेरिया आणि यूके यासारख्या देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद आणि शीख फुटिरतावादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे, चीनकडून केला जाणारा खलिस्तानवाद्यांचा प्रचार केवळ फेसबुकपुरताच मर्यादित नाही, तर चीनची कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी), एक्स आणि टेलिग्राम यासारख्या सामाजिक माध्यमांचादेखील खलिस्तान समर्थकांच्या प्रचारासाठी वापर करत होती. अनेक बनावट खाती आणि बॉट्स मेटाच्या यंत्रणेने पकडले असून, त्यादिशेने तपासही सुरू केला. सदर खाती शीख व्यक्ती चालवत असल्याचे भासवत, त्यावर खलिस्तान समर्थक मजकूर पोस्ट केला जात होता.
चीनकडून चालविल्या जाणार्या कारनाम्यांना ऑपरेशन-के असे नाव देण्यात आले होते. या ’ऑपरेशन-के’च्या माध्यमातून, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये राहणार्या खलिस्तान समर्थकांमध्ये,भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम केले जात होते. इंग्रजी आणि हिंदी भाषेत असलेल्या, या आक्षेपार्ह पोस्ट ’मेटा’ने व्हायरल होण्याआधीच, फेसबुकवरून हटविल्या आहेत. या पोस्टमध्ये एआयद्वारे संपादित केलेल्या बातम्या आणि चित्रे यांचाही समावेश होता. या सर्व गोष्टी पंजाबशी संबंधित होत्या, ज्याचा जगभरातील शीख समुदायामध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. या पोस्टमध्ये खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरची हत्या आणि भारत सरकारच्या कारवायांचा समावेश होता. ’मेटा’ने हा संपूर्ण अहवाल, आपल्या अंतर्गत तपास पथकाच्या ‘समन्वयक अनौपचारिक वर्तणूक’ कार्यक्रमाद्वारे समोर आणला आहे.चीन भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारताच्या शेजारी देशांची मदत घेत आहे. या सर्व कारनाम्यांसाठी चीनला पाकिस्तानचीदेखील मदत होत आहे.
पाकिस्तानच्या ’आयएसआय’च्या सहकार्याने चीन, पंजाब राज्यात संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय हद्दीत पकडण्यात आलेल्या पाकिस्तानातील अनेक ड्रोनमध्ये, चीनचे कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे. आता तो खलिस्तानचा मुद्दा जागतिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आता ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, पाकिस्तान, नायजेरिया आणि युनायटेड किंगडम यांसारख्या देशांमध्ये, खलिस्तानसाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून, याकरिता सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.
अरुणाचल प्रदेशातही चीनने खोड्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र, दरवेळी चीन तोंडावर आपटला. आता तर भाजपला अरुणाचल प्रदेशात, भक्कम असे बहुमतदेखील मिळाले आहे. त्यामुळे चीनच्या अनेक आशा-अपेक्षांवर पाणी फिरले. राहिला प्रश्न खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देण्याचा, तर येत्या 4 जूननंतर त्यावरही रामबाण उपाय शोधला जाईल. त्यावेळी चीनचे दात चीनच्याच घशात घातले जातील, हे मात्र नक्की...
7058589767