कवक कन्या

19 Jun 2024 21:27:21
sheetal pravin desai
 

पावसाच्या आगमनाबरोबर पालापाचोळ्यातून हळूच डोकावणार्‍या, झाडाच्या ओलसर खोडावर चिकटून बसलेल्या नाजूक बुरशींवर अभ्यास करणार्‍या शीतल प्रवीण देसाई यांच्याविषयी...

ग्रामीण भागात राहून दुर्लक्षित प्रजातीवर अभ्यास करणारी ही ‘कवक कन्या.’ या कन्येला भुरळ पडली आहे, ती बुरशीची. पावसाळ्यात रूजून येणार्‍या बुरशींची तिला विशेष ओढ. या ओढीने तिला रानावनात फिरून बुरशींवर अभ्यास करण्यास भाग पाडले. शहरी जीवनात यांत्रिकपणा जाणवल्यानंतर तिने गावाकडे बस्तान हलवून बुरशींवर अभ्यास करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र-गोवा सीमेवर वसलेल्या दोडमार्गातील ही कवक कन्या आहे, शीतल प्रवीण देसाई.

शीतल यांचा जन्म दि. 3 जानेवारी, 1994 रोजी बेळगांवात झाला. सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण हे तेथीलच शासकीय विद्यालयात झाले, तर शिष्यवृत्ती मिळाल्याने पुढील शिक्षण मराठी विद्या निकेतन शाळेत पार पडले. आजोळी गेल्यावर शीतल यांना तेथील निसर्ग आणि वन्यजीव खुणावत असत. झाडांवर फुलणार्‍या विविध प्रजातींचे ऑर्किड, घरापाशी येणारे साप, तेथील जंगल त्यांच्या मनाला निसर्गवाचनासाठी साद घालत. त्या सादेला ओ देत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान विषयातून घेण्याचे निश्चित केले. शाळेत असताना रसायनशास्त्रातून पदवी घ्यायचे ठरले. त्याप्रमाणे पुढे बीएससीला रसायनशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. परंतु, शीतल यांना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्रात शिकविणार्‍या नीता जाधव यांनी वनस्पतींचे एक वेगळेच जग दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे वनस्पतींकडे त्यांचा कल वाढू लागला. मात्र, त्यांना एमएससी तर रसायनशास्त्रामध्येच करायचे होते. परंतु, निसर्गाने त्यांची नाळ ही वनस्पतींसोबतच जोडली होती. त्यांनी कनार्टक विद्यापीठात रसायनशास्त्रात घेतलेला प्रवेश काही कारणास्तव रद्द झाला. त्यामुळे वनस्पतीशास्त्रामधूनच त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

शालेय अभ्यासात विविध जातींचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांची बर्‍यापैकी ओळख होते. मात्र, कवक किंवा बुरशी याबद्दल खूप कमी माहिती दिली जाते. मात्र, एमएससीच्या अभ्यासक्रमादरम्यान त्यांची बुरशीच्या वेगवेगळ्या प्रजातींशी छायाचित्रांमधून ओळख झाली. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतानाच, त्या ‘नेट’, ‘सेट’ आणि ‘गेट’ या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर बेळगांवच्या जी. एस. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रूजू झाल्या. 2017 साली ‘नेचेवर्गीय वनस्पतींची विविधता’ हा विषय त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी निवडला होता. शीतलदेखील सर्व सहभागी विद्यार्थ्यांसोबत रविवारी सुट्टीच्या दिवशी जंगलात जात असत. तिथेच त्यांना एक गोगलगाय दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी शोध सुरू केल्यावर हा प्रकार ‘आयल्याश’ बुरशीचा असल्याचे लक्षात आले. बुरशीची एखादी प्रजात इतकी सुंदर असू शकते, या जाणिवेने ‘कवक’ या गटाबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. नेचेसोबत त्यांनी कवकांचा शोध सुरू केला. कवक निरीक्षक आणि त्याचे छायाचित्रण हा प्रवास सुरू झाला.

विद्यार्थ्यांसोबत मिळून कोल्हापूरचे कवक अभ्यासक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत शीतल यांनी बुरशीच्या 200 पेक्षा अधिक प्रजाती बेळगांवमधील ‘वॅक्सिन डेपो’ या भागातून गोळा केल्या. 130 प्रजातींचे निरीक्षण करून त्यांची नोंद ठेवली. माहितीचा अभाव आणि अपुरे साहित्य यांमुळे बर्‍याच जाती त्यांना ओळखतादेखील आल्या नाहीत. त्यामुळे या विषयात काम करणार्‍या संशोधकांचा शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला. केरळच्या ‘जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे संशोधक प्रदीप आणि ‘मायकोऐशिया’ गटाकडून त्यांना बरीच माहिती मिळाली.

जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात राहणे शीतल यांना आवडू लागले. शहरात किती यांत्रिकपणे जगतो आहोत, याची जाणीव झाली. निसर्गाशी एकरुप होऊन दोडामार्ग तालुक्यात ‘वानोशी फॉरेस्ट होम स्टे’ची सुरुवात केलेल्या प्रवीण देसाई यांसोबत त्यांचे लग्न झाले. एक नवीन प्रवास सुरू झाला. वन्यजीव छायाचित्रकार रमण कुलकर्णी यांच्यासोबत बुरशींचा शोध घेत शीतल यांनी अभ्यासाला सुरुवात केली. येथे दूर जायची गरज नव्हती. कारण, घराच्या अंगणातच 30 पेक्षा जास्त कवक पावसाळ्यात दिसून आले. शीतल यांनी परजीवी बुरशीच्या पाच प्रजातींची आणि चमकणार्‍या बुरशीच्या चार प्रजातींची ‘वानोशी’ येथून नोंद केली आहे. कवकांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे अचंबित करणारे विश्व दाखवण्यासाठी त्यांनी ‘वानोशी’ येथे ‘फंगल कॅम्प’ची सुरुवात केली आहे. सध्या शीतल या गोवा विद्यापीठात डॉ. सिद्धी जल्मी यांच्या मार्गदर्शनाखाली खार्‍या पाण्यात वाढणार्‍या भाताच्या जातीवर पीएचडी करत आहेत. यासोबतच कवकाचाही अभ्यास सुरू आहे.

निसर्गसाखळीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या कवकांच्या वैविध्याचा अभ्यास करणे आणि इतर जैवविविधतेसोबत कवकांचेही जमेल तेवढे जतन ‘वानोशी’च्या आवारात करण्याचे कार्य त्या सुरू ठेवणार आहेत. पीएचडी झाल्यानंतर बुरशींची यादी तयार करणे आणि आजवर ओळख न पटलेल्या बुरशींवर संशोधनाचे काम करण्याचा त्यांचा मानस आहे. महत्त्वाचे म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुरशींवर सखोल अभ्यास करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत. या ‘कवक कन्ये’ला तिच्या पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0