US NSA india tour : 'या' क्षेत्रात महत्त्वपूर्ण भागीदारी!

18 Jun 2024 18:23:41
us nsa india tour bilateral talk


नवी दिल्ली : 
 भारत आणि अमेरिका अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अत्यावश्यक खनिजे, प्रगत दूरसंचार आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवणार आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यातील चर्चेदरम्यान दीर्घकालीन अडथळे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या करारामुळे उभय देशांत सहकार्य वाढीस लागणार असून संबंधित क्षेत्रात भागीदारी होण्यास वाव मिळणार आहे. 


द्विपक्षीय चर्चेदरम्यान ३१ एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोन, लष्करासाठी लढाऊ वाहनांची संयुक्त निर्मिती आणि लढाऊ विमान इंजिनाच्या (जीईएफ ४१४) उत्पादनासाठी जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचाही आढावा घेतला. सुलिव्हन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील बिडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याची ही पहिलीच भेट आहे.

डोवाल आणि सुलिव्हन यांच्यातील चर्चा भारत-युएस इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या (आयएसएटी) फ्रेमवर्क अंतर्गत झाली. भविष्यात भारत – प्रशांत महासागर प्रदेशात दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लोकशाही मूल्ये आणि परस्पर मान्यता यांच्या बरोबरीने तंत्रज्ञानाची रचना, विकसित आणि समन्वित पध्दतीने अंमलबजावणी केली जावी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) आणि इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली.



Powered By Sangraha 9.0