जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या दहशतवादी घटनानंतर विरोधकांनी ‘कलम 370’नंतर तिथे काहीही साध्य झाले नसल्याची टीका केली. परंतु, यादरम्यानच जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गावरील पुलाचेही लवकरच लोकार्पण होणार असल्याची सुवार्ता कानी पडली. त्यानिमित्ताने ‘विकसित काश्मीर’च्या प्रगतीच्या या नवीन उंचीवर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख...
भारतीय रेल्वेच्या इतिहासात जगातील सर्वात उंच अशा रेल्वे पुलावरून उत्तर रेल्वेच्या प्रवासी आणि मालगाड्या आगामी काही दिवसांमध्ये धावू लागतील. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच असा रेल्वे पूल उभारण्यात आला असून, त्या पुलावर टाकण्यात आलेल्या रेल्वेमार्गाच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. त्या एकदा पूर्ण झाल्या की, काश्मीर खोरे रेल्वेमार्गाने उर्वरित भारतास जोडले जाणार आहे. चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारून आपल्या अभियंत्यांनी आणि तेथे कार्यरत असलेल्या अन्य कर्मचार्यांनी खरोखर चमत्कार घडविला आहे.
रामबन ते रिसी अशी रेल्वेसेवा लवकरच सुरू होत असल्याचे उत्तर रेल्वेकडून घोषित करण्यात आले आहे. सध्या कन्याकुमारी ते जम्मूलगतच्या कटरापर्यंत रेल्वे धावते, तर काश्मीर खोर्यामध्ये बारामुल्ला ते संगल्दानपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहे. रिसीचे उपआयुक्त विशेष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या रेल्वेमार्गाची उभारणी म्हणजे ही आधुनिक अभियांत्रिकी जगातील हे एक आश्चर्य मानायला हवे. रेल्वे जेव्हा रिसीमध्ये येईल तो क्षण म्हणजे या जिल्ह्यासाठी परिवर्तनाचा क्षण असेल. आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण असेल. आपल्या अभियंत्यांनी जगातील आठव्या आश्चर्याची निर्मिती केली आहे. वार्याचा वेग लक्षात घेऊन त्या पुलाची केलेली भक्कम उभारणी हे सर्व थक्क करणारे आहे.” नेमक्या कोणत्या तारखेला ही रेल्वेसेवा सुरू होईल, हे सांगण्यात आले नसले तरी ती लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे अधिकार्यांनी या रेल्वेमार्गाची अलीकडेच सखोल चाचणी केली. कोकण रेल्वेचे उपमुख्य अभियंता सुजय कुमार म्हणाले की, “हा प्रकल्प म्हणजे एक आव्हान होते. या प्रकल्पाची झळ ज्यांना-ज्यांना पोहोचली, ते सर्व आनंदी आहेत. सर्व काही लवकरच पूर्ण होईल,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
उधमपूर-श्रीनगर, बारामुल्ला रेल लिंक प्रोजेक्ट या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पातील बनिहाल-संगल्दन या रेल्वेमार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी केले होते. या रेल्वेमार्गावर चिनाब नदीवर जो पूल बांधण्यात आला आहे, तो 359 मीटर उंच आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा या पुलाची उंची 35 मीटरने अधिक आहे. या रेल्वेमार्गाच्या उभारणीमुळे काश्मीर खोरे हे उर्वरित भारताशी रेल्वेमार्गाद्वारे जोडले जाणार आहे.
तंजावरमध्ये सापडल्या दुमीर्र्र्ळ मूर्ती!
तामिळनाडूमधील तंजावर जिल्हा हा तसा समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध. या जिल्ह्यातील कोलीरायनपेत्तई या खेडेगावात बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना अनेक प्राचीन व दुर्मीळ अशा पंचलोहाच्या मूर्ती आढळल्या. या दुर्मीळ मूर्ती सापडल्याने या भागात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा किती खोलवर रुजली होती, याची प्रचीती येते. ज्या जागी या मूर्ती सापडल्या ती जागा मोहम्मद फैजल नावाच्या व्यक्तीच्या मालकीची होती. त्याजागी त्यास घर बांधायचे होते. त्यासाठी खोदकाम सुरू असताना अचानक हा दुर्मीळ ठेवा हाती लागला. या सर्व मूर्ती आणि अन्य कलावस्तू या चोल राजवटीच्या काळातील असाव्यात, असे सांगण्यात आले. या मूर्तींप्रमाणे धार्मिक कार्यांसाठी वापरल्या जाणार्या वस्तूही त्या ठिकाणी सापडल्या. भारतीय पुरातत्त्व विभागाने या ठेव्याची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील दुर्मीळ ठेवा आपल्या ताब्यात घेतला. या ठेव्यामुळे चोल साम्राज्याचे कला आणि वास्तुरचना या क्षेत्रात जे योगदान राहिले आहे, त्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. तंजावर जिल्ह्यात असा दुर्मीळ ठेवा मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 साली याच जिल्ह्यातील पत्तुकोत्ताईमध्ये 14 प्राचीन मूर्ती आणि अन्य दुर्मीळ वस्तू सापडल्या होत्या. तर, 2021 साली पेराम्बुलुर जिल्ह्यामध्ये एका शेतकर्याच्या मुलास हिंदू देवतांच्या सहा मूर्ती सापडल्या होत्या. चोल साम्राज्याच्या काळात नवव्या ते तेराव्या शतकाच्या काळातील या मूर्ती आणि अन्य वस्तू असाव्यात, असा अंदाज आहे. तंजावर परिसरात सापडलेल्या या दुर्मीळ मूर्ती लक्षात घेता, भारतीय संस्कृती किती वैविध्यपूर्ण होती, त्याची कल्पना येते. तसेच यामुळे चोल साम्राज्य किती वैभवसंपन्न होते, त्यावर आणखी प्रकाश पडण्यास मदत होणार आहे.
इंधन दरवाढीबद्दल कर्नाटक सरकारवर टीका
लोकसभेच्या निवडणुका संपताच कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारने आपल्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रति लिटर तीन रुपये वाढ केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या काळात वाढत्या महागाईविरुद्ध केंद्र सरकारवर वाट्टेल तशी टीका करणार्या कर्नाटक सरकारलाही आपल्या राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे भाग पडले. ही दरवाढ गेल्या 16 जूनपासून अस्तित्वात आली आहे. कर्नाटक सरकारने केलेल्या या दरवाढीवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जोरदार टीका केली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे त्या राज्यातील जनतेवर आणखी आर्थिक ताण पडेल, असे ते म्हणाले. काँग्रेसने निवडणुकीच्या काळात प्रत्येक कुटुंबातील महिलेच्या खात्यामध्ये दरमहा 8500 रुपये हस्तांतरित केले जातील, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करणे दूरच, उलट जनतेला पेट्रोल आणि डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कर्नाटक राज्याने केलेल्या या दरवाढीमुळे त्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल हे उत्तर प्रदेश किंवा गुजरात या राज्यांपेक्षा महाग मिळणार आहे. या दरवाढीचा परिणाम अन्य जीवनावश्यक वस्तू महाग होण्यावर होणार हे उघडच आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबद्दल केंद्रातील सरकारवर टीका करणार्या काँग्रेसच्या कर्नाटक राज्यातील सरकारचे खरे रूप या दरवाढीच्या निमित्ताने जनतेपुढे आले आहे, असे म्हणता येईल.
म्यानमारमधून आलेल्यांना परत पाठविण्याची मागणी
नागालँडमधील विविध नागरी संघटनांनी म्यानमारमधून जे बेकायदेशीर नागरिक भारतात घुसले आहेत, त्यांची पुन्हा म्यानमारमध्ये रवानगी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ‘युनायटेड नागा कौन्सिल’, ‘नागा वुमेन्स युनियन’, ‘ऑल नागा स्टुडंट्स असोसिएशन, मणिपूर’ आणि ‘नागा पीपल्स मूव्हमेंट फॉर ह्युमन राईट्स’ अशा संघटनांनी एक संयुक्त निवेदन गृहमंत्री अमित शाह यांना सादर केले आहे. त्या निवेदनात या घुसखोरांना परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भारत-म्यानमार सीमेवरील मणिपूरचा जो काम्जोंग भाग येतो, त्या भागातून ‘आसाम रायफल्स’च्या तुकड्या काढून घ्याव्यात, अशीही मागणी केली आहे. मणिपूरच्या काम्जोंग जिल्ह्यामध्ये म्यानमारमधून आलेल्या सुमारे 5,457 बेकायदेशीर घुसखोरांनी आश्रय घेतला आहे. या बेकायदेशीर नागरिकांमुळे त्या भागातील आठ खेड्यांमधील सामाजिक आणि सांस्कृतिक समतोल ढळला आहे. त्यातून समाजकंटकांचा त्रासही वाढला आहे. या घुसखोरांची त्यांच्या मायदेशात परतपाठवणी करण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या बेकायदा घुसखोरांमुळे सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न तर उपस्थित झाले आहेतच. तसेच सुरक्षाविषयक प्रश्नही निर्माण झाला आहे, याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. शेजारच्या म्यानमारमधून भारतात घुसखोरी सुरूच आहे. मणिपूर-म्यानमार या दरम्यानची बरीच सीमा अजून खुली असल्याने त्या देशातून भारतात बेकायदेशीर नागरिक सर्रास घुसखोरी करीत असतात. नागालँडमधील नागरी संघटनांनी ही जी मागणी केली आहे, ती लक्षात घेऊन त्यावर केंद्र सरकार काय पावले उचलते, याकडे आता लक्ष आहे.
9869020732