मुंबई : महाविकास आघाडी म्हणजे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याची कोटा फॅक्टरी आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शिवसनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता केशव उपाध्येंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
केशव उपाध्ये म्हणाले की, "महाविकास आघाडीला पराजय पत्करता येत नाही हे वारंवार दिसून येत आहे. लोकसभा निकालांआधी तर रेटून खोट बोलण्याची स्पर्धा या आघाडीत होतीच, पण आता निकालानंतर त्यात वाढच झाली आहे. निती आयोगाकडून महाराष्ट्राला कमी निधी आणी बोर्डाला १० कोटींचा निधी या दोन्ही खोट्या नॅरेटिवनंतर आता म्हणजे ईव्हीएमला मोबाईल जोडण्याची नवीन स्कीम त्यांनी सुरु केली आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "वायकरांच्या माणसाने ईव्हीएमला जोडला असणारा मोबाईल वापरला, असं ते म्हणतात. मग शेजारच्या मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली तिथे ईव्हीएममध्ये दोष नाही आणि इथे दोष आहे का? लोकांना किती मुर्ख समजाल? निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयात वारंवार आपटूनही तोच खोटेपणा किती काळ पसरवणार?" असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.