भारतातील ईव्हीएमबाबत सुरक्षिततेचे सर्व उपाय

17 Jun 2024 13:29:10

EVM
नवी दिल्ली : भारतात ईव्हीएम यंत्रावर आजवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अनेक संघटना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमला हटविण्यासाठी आंदोलने केली आहेत. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी टेस्ला आणि स्पेसएक्स यांसारख्या जगविख्यात कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली. ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे याचा वापर करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र, भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना प्रत्युत्तर दिले आहे.
 
“एलन मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल, पण भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष
बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. आमच्या यंत्रात ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट यांसारखी कोणतीही कनेक्टिव्हीटीची सुविधा नाही. भारतासारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात. एलॉन मस्कला सांगू इच्छितो की, हवे तर आम्ही त्यासाठी शिकवणीवर्ग घेऊ शकतो,” असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
 
रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्यपोस्टवरून शंका अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएमबाबत एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टबाबत एलॉन मस्क यांनी आपली शंका उपस्थित केली. अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने येण्याची शक्यता आहे. याआधी 2020 साली हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते.
 
‘ईव्हीएम’वरून काँग्रेसचा पुन्हा रडीचा डाव “इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बद्दल रडीचा डाव काँग्रेसने पुन्हा खेळायला सुरू केला आहे. काही शब्दांची फेरफार आणि माध्यमातील काही एचएमव्ही हाताशी धरून पुन्हा एकदा ही लबाड लांडग्याची टोळी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्यासाठी तयार झाली आहे,” असा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भातील ‘एक्स’ पोस्ट महाराष्ट्र भाजपने केली आहे. ‘एक्स’ आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी “इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक होऊ शकते, ते हटवले पाहिजे,” असा खळबळजनक दावा केला आहे.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करत तसेच एका दैनिकातील ईव्हीएम संदर्भातील वृत्ताचा हवाला देत पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’च्या वस्तुनिष्ठतेवर सवाल केले आहेत. विरोधकांचे उमेदवार निवडून आले तरी अयोग्य कसे? भाजपने ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ईव्हीएमला अन्य कोणतेही इलेक्ट्रोनिक किंवा इतर उपकरण जोडणे अशक्य आहे. म्हणून त्यात मोबाईलद्वारे गडबड झाली, हे म्हणणे विरोधकांची भ्रमित मानसिकता दर्शविणारे आहे. काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे जेवढे उमेदवार निवडून आले, तेदेखील ईव्हीएमने निवडून आले, मग ते योग्य आणि हे अयोग्य कसे?” असा सवाल केला आहे.
काय म्हणाले राजीव चंद्रशेखर
एलन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. मस्क यांची टिप्पणी ही खूपच वरवरची आणि सामान्यीकरण असलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, कोणीच सुरक्षित हार्डवेअर करू शकत नाही का? मला वाटते, हे साफ चुकीचे आहे. एलन मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल, पण भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत.
 
आमच्या यंत्रात ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट यांसारखी कोणतीही कनेक्टिव्हीटीची सुविधा नाही. भारतासारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात. एलन मस्कला सांगू इच्छितो की, हवे तर आम्ही त्यासाठी शिकवणीवर्ग घेऊ शकतो, असा टोला राजीव चंद्रशेखर यांनी लगावला आहे.
  
  
Powered By Sangraha 9.0