सामान्य माणूस ते मराठी कलाकारांच्या चेहर्याला आकर्षक करण्याचे काम, डोंबिवलीतील मेकअप आर्टिस्ट रिया पांचाळ करतात. त्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी अधिक जाणून घेऊया..
रिया यांचा जन्म अंधेरी येथे झाला. त्यांनी पार्ले टिळक शाळेमधून शालेय शिक्षण घेतले आहे. त्या साठये महाविद्यालयामधून पदवीधर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच, त्या आपले आवडीचे क्षेत्र असलेल्या मेकअपशी संबंधित क्षेत्रात काम करत होत्या. पण वडिलांचा आग्रह आधी शिक्षण पूर्ण कर, असाच होता. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांचा मेकअप करणारे, सुप्रसिध्द रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांच्याकडे रिया यांनी मेकअपचे धडे गिरविले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट जीन यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. मेकअप आर्टिस्ट मुकेश पाटील यांचेदेखील त्यांना सहकार्य लाभलेे. रियाच्या घरी मेकअप आर्टिस्ट म्हणून यापूर्वी कधीच कोणी करिअर केले नव्हते. त्यामुळे रियानेही वकिली करावी, अशी तिच्या बाबांची इच्छा होती. रिया यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याच्याशी संबंधित त्यांना एक नोकरीही मिळाली. पण त्यात त्या काही फारशा रमल्या नाहीत. त्यांनी या नोकरीला कायमचा रामराम ठोकला.
दरम्यानच्या काळात रिया यांचा विवाह अजय पांचाळ यांच्याशी झाला. विवाहानंतर रिया या डोंबिवलीकर झाल्या. विवाहानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच, रिया यांच्या पतीची नोकरी गेली. त्यामुळे राहते घरही विकावे लागेल की काय, अशी परिस्थिती उद्भवली होती. पण रिया यांनी मोठ्या ध्येयाने या परिस्थितीला तोंड देण्यास सुरुवात केली. एका दैनिकाच्या स्पर्धेसाठी, रिया यांनी मेहेंदी काढून पाठवली होती, त्यात त्यांना पारितोषिक मिळाले. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या हातात कला असल्याचे त्यांना सांगितले. त्यांचा मेहेंदीचा घरातून सुरु झालेला प्रवास, आज डोंबिवलीतील ‘प्रवरा मेकअप स्टुडिओ आणि सलोन’ची स्थापना इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. यामुळे अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांना ग्रुमिंग करता एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. रिया यांचे वैशिष्ट्य असे की, ब्रायडल मेकअप असो, वा एखाद्या सेलिब्रिटींचे ग्रुमिंग, रोज काहीना काहीतरी नावीन्यपूर्ण कौशल्य दाखवत, रिया यांनी अनेकांची पसंती मिळविली आहे.
आतापर्यंत सुप्रसिध्द अभिनेत्री तेजश्री प्रधान, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ, प्रिया मराठे, भाग्यश्री लिमये, पूजा सावंत, रिंकू राजगुरू, हेमांगी कवी, अदिती सारंगधर, श्रेया पिळगावकर प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनय बेर्डे, समीर चौगुले, शंतनु मराठे, अशोक सराफ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित कलाकारांना मेकअप केला आहे. रिया यांनी आतापर्यंत तनिष्क, मलबार गोल्ड, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्यासारखे मोठे ब्रॅण्ड्स, साडीचे बॅण्ड्स यांव्यतिरिक्त ‘पूर्णब्रह्म’च्या (हॉटेल इंडस्ट्री) सर्वेसर्वा जयंती कठाळे, लावणीचे कार्यक्रम करणार्या लोक-कलावतांचा मेकअप केलेला आहे. याशिवाय, विविध प्रातांतील लग्न सोहळ्यातील वधू-वरांबरोबर त्यांच्या नातेवाईक यांना उत्तम मेकअप करून, त्यांचीही कौतुकाची थाप मिळविली आहे. रंगाभूषाकार या क्षेत्रतील १८ वर्षांच्या मेहनतीचे फलित म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिध्द फोटोग्राफर तेजस नेरूकर यांची मेकअप आर्टिस्ट म्हणून रिया यांना नेहमीच पसंती असते.
तसेच समाजमाध्यमातून त्यांचे ५० हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ९० पेक्षा अधिक देशांतील परदेशी मॉडेल्स, मालिका ते हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत कित्येक विवाह सोहळ्यांत, कार्यक्रमांत, पोर्टफोलिओ करिता रिया हे नाव ‘उत्तम मेकअप आर्टिस्ट’ म्हणून गाजत आहे. रिया या सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही करत आहेत. त्यामुळेच ‘रोटरी क्लब ’संस्थेतील मुलींना त्या मेकअप आर्टिस्टचे मोफत प्रशिक्षण देण्याचे काम करतात. गुगल सर्चमध्ये सर्वोत्कृष्ट रंगभूषाकारांच्या यादीत, सुप्रसिध्द मेकअप आर्टिस्ट म्हणून रिया यांचे नाव दिसून येते. रिया यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. रिया यांच्याकडून १ हजार, ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मेकअप आर्टिस्टचे धडे गिरविले आहेत. “पती अजय यांच्या पाठिंब्यामुळे मी एवढा प्रवास करू शकले,” असे रिया सांगतात.
“एका कंपनीसोबत काम करत असताना, मला तब्बल १३० परदेशी मॉडेल्सचा मेकअप करण्याची संधी मिळाली. परदेशातील मुलींचा त्वचेचा रंग गोरा असतो. त्यामुळे त्यावर मेकअप करणे कठीण असते. मात्र, भारतात प्रांतानुसार माणसांच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते. प्रत्येक व्यक्तीचा रंगाचा पोत हा वेगळा असतो. मात्र, त्याला कमी न लेखता त्याला नैसर्गिक पोत देऊन खुलविण्याचे काम आम्ही करतो,” असे रिया सांगतात. अशा सर्वात्तम कलाकृती घडवण्याकरिता कायम प्रयत्नशील असणार्या कलेच्या उपासक रिया पांचाळ यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!