बॉलीवूड पहिल्याच डावात ‘सर’ करणारा दिग्दर्शक

15 Jun 2024 21:41:27
aditya sarpotdar


कोकणातील ‘मुंज्या’ हे भूत हिंदीत मोठ्या पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी आजवर मराठीतही विविध दिग्दर्शकीय प्रयोग केले. ‘उलाढाल’, ‘उनाड’, ‘नारबाची वाडी’, ‘फास्टर फेणे’, असे अनेक सुपरहिट चित्रपट देणार्‍या आदित्य सरपोतदार यांच्यासोबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद...
 
‘मुंज्या’ साकारण्यासाठी ‘कांतारा’ ठरला निमित्त...

“मी कोकणातला असल्यामुळे लहानपणापासूनच मुंज्याबद्दल मला माहित होतं. थोरा-मोठ्यांकडून बर्‍याचशा गोष्टीही ऐकल्या होत्या. लहानपणी ते सगळं काही खरं वाटतं की, पिंपळाच्या झाडावर मुंज्या असतो. रात्री त्या झाडाखाली गेलात तर मुंज्या झपाटतो, असा समज नक्कीच असतो आणि फार पूर्वीपासून हा आशय डोक्यात होता. पण, यावर चित्रपट करावा, असा काही विचार मी कधीच केला नव्हता. परंतु, ज्यावेळी मी ‘कांतारा’ चित्रपट पाहिला, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, आपल्या कोकणातही अशा जुन्या परंपरा आहेत, त्यांनाच आपण का मोठ्या पडद्यावर आणत नाही आणि त्या हिंदीत का घेऊन येत नाही. हिंदी याकरिता, कारण हिंदी चित्रपटसृष्टीचा आवाका फार मोठा असल्यामुळे देशभरात आपल्या कोकणातील ही प्रथा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तेव्हा मग हिंदीत ‘मुंज्या’वर चित्रपट करायचा विचार केला. गंमत म्हणजे, मेडॉकसोबत ज्यावेळी माझं बोलणं झालं, तेव्हा मला असं समजलं की, गेले काही दिवस ते देखील मुंज्यावर कलाकृती करण्याच्या विचारात होते. योगेश चांदेकर चित्रपटाची कथा लिहित होते. त्यांच्यासोबत भेट झाली आणि मुंज्याचा प्रवास दिग्दर्शक म्हणून सुरु झाला,” अशी ‘मुंज्या’च्या निर्मितीमागची कथा आदित्य सरपोतदार यांनी सांगितली.

 
मोठ्या निर्मिती संस्था दिग्दर्शकांना दिलासा देतात

मराठी दिग्दर्शकांना ज्यावेळी हिंदीत मोठ्या निर्मिती संस्थांची साथ लाभते, त्यावेळी कोणते बदल होतात, असे विचारले असता, आदित्य म्हणाले की, “मराठी मनोरंजन क्षेत्रात उत्तम प्रेक्षक आहेत आणि कलाकारही फार ताकदीचे आहेत. पण, मार्केटिंग क्षेत्रात आपण जरा मागे पडतो. कारण, आपल्याकडे मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्राबाहेर तसा कमी आहे. मराठी मनोरंजनसृष्टीला आर्थिक फायदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत नाही. कारण, महाराष्ट्रातच मराठी चित्रपट बहुतांश आर्थिकदृष्ट्या कमाई करतात. त्यामुळे निर्मितीवर प्रारंभीपासूनच फार बंधने येतात. कारण, चित्रपट चाललाच नाही किंवा चित्रपटाने कमाईच केली नाही, तर निर्मिती खर्च अधिक असल्यामुळे आर्थिक फायदा कमी होतो आणि त्याचमुळे बर्‍याचवेळा मराठी चित्रपट नियंत्रित आर्थिक खर्चात तयार केले जातात. दुर्दैवाची बाब म्हणजे, मराठी चित्रपट गेल्या दोन-तीन वर्षांत अपेक्षित कमाई करताना दिसत नाही. पण, ज्यावेळी आमच्यासारख्या मराठी दिग्दर्शकांच्या पाठीशी मोठ्या निर्मितीसंस्था उभ्या राहतात, त्यावेळी जी कथा मांडायची आहे, ती भव्यरित्या सांगण्याचे आमचे धाडस नक्कीच वाढते. शिवाय, ज्यावेळी दिग्दर्शकांना निर्माते सांगतात की, आर्थिक बाजूचा विचार न करता तुम्ही चित्रपट तयार करा, तेव्हा आपसूकच मानसिकरित्याही कलाकार म्हणून आम्ही निश्चिंत होतो आणि मग ‘मुंज्या’सारखी कलाकृती घडते.”


‘मुंज्या’ची कथा ही त्याचीच वाटावी म्हणून कास्टिंगवर विशेष भर

‘मुंज्या’ चित्रपटातील कास्टिंगबद्दल बोलताना आदित्य सरपोतदार म्हणाले की, “या चित्रपटात कास्टिंगसाठी मला निर्मिती संस्थेने सूट दिली होती. मुळात ‘मुंज्या’ या चित्रपटाची कथा, त्याचा नायक हा मुंज्या असल्यामुळे कोणत्याही मोठ्या किंवा नावाजलेल्या कलाकाराची निवड न करता, नवोदित आणि चांगल्या कलाकारांची या चित्रपटासाठी मी निवड केली, जेणेकरुन हा चित्रपट आणि त्याचा नायक मुंज्याच राहील. पण, सोबतीने इतर कलाकारही अधोरेखित होतील, याची पुरेपूर काळजी घेत अभय वर्मा, शर्वरी वाघ, सुहास जोशी, मोना सिंग, अजय पुरकर आणि इतर कलाकारांची निवड करण्यात आली. मुळात मला जर का ही कोकणातील कथा आहे, तर त्याला साजेसाच कलाकार हवा होता. तिथे मला पंजाबी किंवा इतर भाषिक कलाकाराकडून मराठी भाषा वदवून घ्यायची नव्हती. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ‘मुंज्या’ जर का २१-२२ वर्षांच्या मुलाला झपाटतो, तर तो त्याच वयोगटातील कलाकार घ्यावा, असाही माझा अट्टहास होता.” त्यामुळे ‘मुंज्या’साठी सरपोतदार यांनी फार विचारपूर्वक कास्टिंग केल्याचे नक्कीच निदर्शनास येते.

पुढे बोलताना सरपोतदार म्हणाले की, “माझं असं मत होतं की, ‘मुंज्या’ हे जरी भूत असलं, तरी तो एक लहान मुलगा असल्यामुळे त्याच्यातील निरागसपणा कुठेही हरवू द्यायचा नव्हता आणि लहान मुलांनीदेखील तो पाहावा म्हणून ‘हॉरर’ चित्रपट करावा, असा विचार न करता, ‘हॉरर-कॉमेडी’ जो लहान मुलांनाही बघण्यात रस असेल, असा विचार हा चित्रपट करताना प्रामुख्याने केला होता. ‘मुंज्या’ हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला. ग्राफिक्सच्या माध्यमातून तो साकारण्यासाठी ‘डीनेग’ ही आंतरराष्ट्रीय कंपनी आमच्यासोबत जोडली गेली. ही कंपनी हॉलीवूडच्या बर्‍याच चित्रपटांसाठी व्हीएफएक्सचे काम पाहते आणि त्यांच्या मदतीने ‘मुंज्या’ ग्राफिक्सच्या मदतीने आम्ही सादर केला. ठरावीक बजेटमध्येच आम्ही व्हीएफएक्सच्या मदतीने ‘मुंज्या’ तयार केला होता. कारण, आम्हाला कल्पना होती की, कोणताही मोठा कलाकार या चित्रपटात नाही. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, पण तो नेमका किती मिळेल, याचा अंदाज नसल्यामुळे आम्ही प्रयत्न केला होता. पण, सुदैवाने फार उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिल्यामुळे समाधान नक्कीच आहे,” असे देखील सरपोतदार म्हणाले.


व्हीएफएक्सने उभी केली ‘मुंज्या’ची चेटुकवाडी

‘मुंज्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणाची एक खासियत सांगताना आदित्य म्हणाले की, “ ‘मुंज्या’ चित्रपटात जी चेटुकवाडी, किल्ला, पायवाट हे सारं काही दाखवलं हे सारं काही व्हीएफएक्सच्या मदतीने उभं केलं आहे. ‘मुंज्या’ ज्या पिंपळाच्या झाडावर राहतो, ते झाड आणि जंगल याचा आम्ही मुंबईच्या फिल्मसिटीत एका बंद स्टुडिओमध्ये सेट उभारला होता आणि बाकी सगळं चेटुकवाडीचं जग आम्ही व्हीएफएक्सने उभारलं होतं. कथेच्या मागणीनुसार रात्री आम्ही चित्रीकरण करत होतो आणि दिग्दर्शक म्हणून मला हवं तसं लोकेशन मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.”

 
सध्या हिंदीत अधिक मोकळीक मिळते...
 
मराठीत ‘झोंबिवली’, ‘उनाड’, ‘नारबाची वाडी’ असे अनेक वेगवेगळे प्रयोग मी करुन पाहिले. पण, सध्या मराठीत सामाजिक, स्त्रीप्रधान चित्रपट अधिक येताना दिसत असून, प्रेक्षक त्यांना पसंतीदेखील देत आहेत. परंतु, स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी लागणारी समज माझ्यात नाही आणि सध्या तरी तसे कोणतेही चित्रपट हाती नाही. सध्या मला हिंदीत ज्या आशयाचे चित्रपट करायचे आहेत, त्यात स्वातंत्र्य, मार्केट मिळत असल्याकारणाने, मराठी ऐवजी आगामी एक चित्रपट मी हिंदीत करत आहे. आणखी एक कारण म्हणजे, त्या चित्रपटासाठी मराठीत मला तितकं आर्थिक पाठबळ मिळणार नसल्यामुळेही हिंदीत तो प्रयोग करत आहे. पण, या दरम्यान मराठीत करण्याजोगी कथा हाती लागली, तर नक्कीच मराठी चित्रपट करेन,” अशी ग्वाहीदेखील यावेळी आदित्य यांनी दिली.
 
मराठी दिग्दर्शकांबद्दल काही गैरसमजही दूर करायचे होते...

मराठी कलाकार जसे हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कामं करत आहेत; तसंच मराठी दिग्दर्शकही हिंदीत चित्रपट साकारत आहेत. पण, मराठी दिग्दर्शकांबाबतीत काही गैरसमज असतात, त्याबद्दल आपलं मत मांडताना आदित्य म्हणतात की, “मराठी दिग्दर्शक ज्यावेळी हिंदीत कोणताही चित्रपट करतात, त्यावेळी अधिक जबाबदारी वाढते. कारण, लोकांचा असा समज आहे की, मराठी दिग्दर्शकांचे हिंदी चित्रपट चालत नाहीत आणि याच्या विरोधात जाऊन मला मराठी दिग्दर्शक म्हणून हिंदीत कौटुंबिक, करमणूक करणारा आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक चित्रपट करायचा होता, जो मी ‘मुंज्या’च्या निमित्ताने साध्य केला.”


आदित्य सरपोतदार यांचे आगामी हिंदी चित्रपट लवकरच येणार असून, त्यापैकी एका चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत ‘काकूडा’ हा चित्रपट मी दिग्दर्शित केला असून ‘ओटीटी’वर लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘काकूडा’ हा चित्रपटही ‘हॉरर-कॉमेडी’ असून ही कथा मथुरेतील एका गावाची आहे. त्या गावात एक भूत आहे, ज्याला ‘काकूडा’ म्हटलं जातं, तर ती कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.”
 
Powered By Sangraha 9.0