भुतांच्या गावाची सैर करून देणारा ‘अल्याड-पल्याड’

14 Jun 2024 20:33:58
alyad palyad marathi film


समजा, तुम्हाला असं सांगितलं की, गावात दोन-तीन दिवसांसाठी गावकरी गाव सोडून जातात आणि तिथे भूतं येऊन राहतात. खरं वाटेल का? नाही ना? पण, खरंच महाराष्ट्रातील काही गावांमध्ये पिढ्या न् पिढ्या ही प्रथा सुरू आहे. याच प्रथेवर आधारित ‘अल्याड-पल्याड’हा चित्रपट दि. १४ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘हॉरर कॉमेडी’चा एक आगळावेगळा प्रयोग करून पाहिला आहे. जाणून घेऊयात ‘अल्याड-पल्याड’ चित्रपटाबद्दल....

महाराष्ट्रातील काही गावांमध्ये भूतं राहायला येतात आणि गावकरी वेशीच्या बाहेर जाऊन दोन-तीन दिवस राहतात. ही प्रथा आजही सुरु आहे. पण, ही प्रथा एका काल्पनिक कथेला जोडून ‘अल्याड-पल्याड’या भयपटातून दिग्दर्शकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर, चित्रपटाची कथा घडते, कोकणातील एका गावात. जिथे ठरावीक दोन दिवसांसाठी संपूर्ण गाव घरातील देवांची पूजा करून, दाराबाहेर नैवेद्य आणि दिवा लावून नदीच्या पलीकडे राहायला जातं. गावाच्या सरपंचांच्या हस्ते ही भुतं राहायला येण्याआधी पूजा केली जाते. त्याच गावातील एका गावकर्‍याचा मुलगा जो शहरात शिकायला असतो (भाग्यम) तो आपल्या दोन मित्रांना (सक्षम कुलकर्णी आणि गौरव मोरे) या दोन दिवसांत फिरवण्यासाठी घेऊन येतो. संपूर्ण गाव नदीपलीकडे जातं. पण, गौरवचा गावात भूतं राहायला येतात, यावर विश्वासच नसतो आणि त्याला पुन्हा गावात जाऊन नेमकं काय घडतं, हे त्याच्या कॅमेर्‍यात कैद करायचं असतं. यासाठी तो आपल्या मित्रांना तयार करतो आणि तीन मित्र संदीप पाठकच्या होडीतून पुन्हा गावात जातात. पण, ज्या क्षणी त्यांची होडी गावात येते, त्या क्षणापासूनच काहीतरी अघटित घटना घडण्यास सुरुवात होतात. आता भूतं का राहायला येतात, त्यामागचं कारण काय असतं, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट नक्कीच पाहायला हवा.

मराठी चित्रपटसृष्टीत खरंच पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भयपटाची मांडणी करण्याचे धाडसाचे काम आणि जोखीम दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी पत्करलेली दिसते. यासाठी त्यांचे विशेष कौतुक. कोकणातील एका खर्‍याखुर्‍या गावात त्यांनी हे चित्रीकरण केल्यामुळे चित्रपट पाहताना त्याचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवतो. मुळात भयपट आणि विनोद यांची एकत्र बांधणी बर्‍यापैकी दिग्दर्शकाला चांगलीच जमली आहे. परंतु, मध्यंतरापूर्वी कथा फारच ताणून धरल्यासारखी वाटते; याशिवाय ‘हास्यजत्रा फेम’ गौरव मोरे असल्यामुळे उगीचच बर्‍याच जागी विनोद जाणूनबजून पेरल्याचेही अधोरेखित होते. त्यामुळे मुळात कथा काय आहे, हे समजण्यासाठी मध्यंतरानंतरचा भाग तसा उत्सुकता निर्माण करणारा आहे. दिग्दर्शकाला नेमकी कथा काय सांगायची आहे, हे तर प्रेक्षकांना नक्कीच समजेल, पण त्याची मांडणी किंवा काही पात्रांचा भूतकाळ हा न दाखवल्यामुळे, त्यांचे धागेदोरे नेमके कथानकाशी कसे जोडले आहेत, हे समजून घेण्याचा तसा गोंधळच उडतो. पण, नेपथ्य, वेशभूषा, गावात उभारलेले सेट मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा काही अंशी नक्कीच उंचीवर नेणारे म्हणावे लागतील.

कोणत्याही भयपटासाठी रंगभूषा किंवा वेशभूषा करून दाखवलेलं भूत किती भीतिदायक आहे, यापेक्षा त्याचं संगीत, पार्श्वसंगीत किती भिडणारं आहे, यावर बर्‍यापैकी भयपटाचं गणित बेतलेलं असतं, असं नक्कीच म्हणता येईल. ‘अल्याडपल्याड’ चित्रपटाच्या बाबतीत संगीत विभागाने नक्कीच यशस्वी कामगिरी केली आहे. नेमक्या ठिकाणी भीती वाटावी, असं पार्श्वसंगीत आणि ती भीती आणखी शिगेला पोहोचवणारं संगीत भयपटाला साजेसं आहे.

अभिनयाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, या चित्रपटात गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, संदीप पाठक, भाग्यम आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे, यात दिग्दर्शक प्रीतम यांनीही फार महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून, या सर्व कलाकारांपेक्षा त्यांचाच अभिनय सरस वाटतो. गौरव मोरे असल्यामुळे विनोदी भाग त्याने नक्कीच उत्तम सादर केला असला, तरीही त्याच्या अभिनयात फार काही नावीन्य जाणवत नाही. याउलट, अभिनेता भाग्यम ज्याने या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे, त्याने इतरांपेक्षा छान अभिनय केला आहे.

एकूणच मराठीतील भयपट आणि विनोदीपटाचा हा निराळा प्रयोग नक्कीच एकदा तरी पाहण्यासारखा आहे. कारण, या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका जुन्या प्रथेबद्दल माहिती मिळते.


चित्रपट : अल्याड-पल्याड
दिग्दर्शक : प्रीतम एस.के. पाटील
कलाकार : गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, भाग्यम, अनुष्का पिंपुटकर, मकरंद देशपांडे, संदीप पाठक
रेटींग : ***



Powered By Sangraha 9.0