धारावीकरांना धारावीतच घर मिळणार

13 Jun 2024 12:42:24

dharavi


मुंबई, दि.१३ :
धारावी रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल ) धारावीच्या पुनर्विकासासाठी कटीबद्ध आहे. सगळ्या पात्र झोपडपट्टी धारकांना धारावीतच ३५० चौरस फुटाची पुर्णपणे मोफत घरे दिली जाणार आहे. जी मुंबईतील इतर कुठल्याही भागातील एसआरएच्या घरांपेक्षा १७ % मोठी आहे. जे अपात्र आहेत त्यांना सुद्धा राज्य शासनाच्या धोरणानुसार मुंबईत घरे मिळणार आहेत, अशी माहिती डीआरपीपीएलने दिली आहे. हा पुर्नविकास प्रकल्प आश्वस्त करतो की, धारावीतील रहीवाश्यांचे जीवनमान उंचावले जाईल आणि त्याच बरोबर आरामदायक घरात राहण्याची प्रतिष्ठा मिळवून देईल. सोबतच व्यावसायिकांना राज्य शासनाच्या धोरणानुसार यात गाळे आणि परिसर दिला जाणार आहे, अशी माहितीही डीआरपीपीएलने दिली आहे.

दरम्यान, सोमवार, दि.१० रोजी सेक्टर ५च्या विविध भागात सर्वेक्षण प्रक्रीया सुरु होती. यावेळी धारावी बचाओ आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करून ही प्रक्रिया बंद पाडली, यात शताब्दीनगर आणि नाईकनगरचा ही समावेश होता. यावेळी आम्हाला घरे धारावीतच मिळतील असे लेखी आश्वासन हवे आहे . आम्ही सर्व्हेक्षण पुन्हा सुरु करण्यास परवानगी देऊ, अशी मागणी नाईकनगर येथील स्थानिकांनी दिली.

यापार्श्वभूमीवर डीआरपीपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, हे खेदजनक आहे की या पुनर्विकास प्रकल्पाला काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सर्व्हेक्षणाचे काम राजकिय स्वार्थामुळे थांबवावे लागले आहे. बहुतेकांचा या सर्वेक्षणाला पाठिंबा आहे. पण काहींच्या हेतुपुरस्सर वागण्याने अनेकांना राहण्यायोग्य घरात जाण्यापासून दूर राहूनहाल सहन करावे लागत आहे. डीआरपीपीएलचा विश्वास आहे की, या प्रकल्पाला राजकिय रंग न देता, सामुहीक प्रयत्नातून मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प म्हणुन पाहण्यात यावे. हा प्रकल्प धारावीला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे पुढचे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे नवधारावीचे लोक एका नव्या आणि आधुनिक धारावीची अनुभूती घेतील. त्याच सोबत धारावीतील प्रत्येक पात्र उद्योगाला पाच वर्षाकरीता राज्य शासनाच्या वस्तू आणि सेवा करकर भरपाई करून दिला जाणार आहे. हा पुढाकार घेण्यामागचा उद्देश धारावीमधल्या उद्योंगाच्या, व्यावसायिकांच्या, नवउद्योजकांच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता यावी, सातत्य टिकून राहावे आणि चालना मिळावी हे आहे, अशी माहितीही डीआरपीपीएलने दिली.
Powered By Sangraha 9.0