ज्ञान‘लक्ष्मी’

13 Jun 2024 21:03:28
laxmi shivrama


‘युपीएससी’चे स्वप्न पाहणार्‍या लक्ष्मी शिवरामा यांना समाजकार्याने भूरळ पाडली आणि शिक्षणाचे महत्त्व आपसूक पटल्यामुळे समाजासाठी एक आधुनिक शिक्षिका तयार झाली. अशा या ज्ञान‘लक्ष्मी’विषयी...

आर्थिक स्थैर्यासाठी कॉर्पोरेट किंवा सरकारी क्षेत्रातील नोकरी कोणतीही सामान्य व्यक्ती पत्करेल. कारण, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे जाते. पण, सामाजिक क्षेत्रात केवळ एक आवड म्हणून गरजूंना मदत करणे आणि प्रत्यक्ष या क्षेत्रात कार्यरत राहाणे, या खरोखरीच दोन भिन्न बाबी. ‘युपीएससी’चे शिक्षण घेण्याचा ध्यास मनाशी बाळगणार्‍या लक्ष्मी शिवरामा यांना शिक्षण घेण्यापेक्षा शिक्षण देण्याची कला अवगत आहे, याचे भान आले आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल...

लक्ष्मी यांचा जन्म मुंबईतील चेंबूरमध्ये झाला. तेथील स्वामी विवेकानंद विद्यालयात त्यांनी शालेय धडे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही कारणास्तव वाशीला कुटुंबासमवेत राहायला गेल्यामुळे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी शाळेत पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता पुन्हा लक्ष्मी मुंबईच्या दिशेला आल्या आणि अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी कला शाखेत एसआयईएस महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर रुईया महाविद्यालयातून लक्ष्मी यांनी दोन विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. ते विषय म्हणजे, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान. लक्ष्मी यांना त्यांच्या शिक्षण घेण्याच्या सीमा मर्यादित कधीच करायच्या नव्हत्या. त्यामुळे इतर विषयांमधील ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची घोडदौड सुरूच होती. लक्ष्मी यांना ‘युपीएससी’ची परीक्षा द्यायची असल्याकारणाने, त्यांनी तो अभ्यासदेखील पदवीचे शिक्षण घेत असताना सुरू ठेवला. तसेच, फॉरेन्सिक सायकोलॉजी, पोलीस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षणही त्यांनी घेतले. पण, ‘युपीएससी’चा ध्यास घेतलेल्या लक्ष्मी यांनी एक परीक्षा तर दिली, पण त्यांनी जेव्हा आत्मपरीक्षण केले, त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा कल सामाजिक क्षेत्राकडे अधिक असून त्यांना लहान मुलांना शिकवण्याची फार इच्छा आहे.

आपल्या मनाचे ऐकून त्यांनी सामाजिक क्षेत्रातील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्मी यांनी ‘इनक्लुझिव्ह एज्युकेशन’मध्ये ‘सर्टिफिकेट कोर्स’ व ‘स्पेशल एज्युकेशन’मध्ये त्यांनी पदव्युत्तर डिप्लोमा हा ‘एशियन कॉलेज ऑफ टीचर्स’मधून पूर्ण केला आणि दिव्यांग लहान मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही वाटचाल २०१६ मध्ये सुरू झाली. ‘आटमन अकॅडमी’मध्ये लक्ष्मी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षणाचे प्रोग्राम डिझाईन करू लागल्या. ‘टीच फॉर इंडिया’शी जोडले जात लक्ष्मी यांनी झोपडपट्ट्यांमधील लहान मुलांना शिक्षण देत, त्यांना इतर सुखसोयींचा लाभ घेऊन देण्यासही मदत केली. बर्‍याचशा मुलांना आर्थिक अडचणींमुळे फिरायला जाणे, टीव्ही पाहणे किंवा अन्य लहान मुले ज्या चैनीच्या गोष्टी अनुभवतात, त्या अनुभवणे फार कठीण असते, तर अशा मुलांसाठी लक्ष्मी एनजीओंसोबत काम करतात.

याशिवाय एका कोचिंग क्लासमध्ये ‘भूगोल’ हा विषय त्या शिकवत होत्या आणि सोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांनाही त्या शिक्षणाचे धडे देत होत्या. लक्ष्मी यांचा कायम फारशा सोयी-सुविधा न मिळणार्‍या लहान मुलांकडे कल अधिक होता. त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी शिक्षणाचा किंवा अभ्यासाचा विशेष आराखडा तयार करणे, हे त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलेच. त्याचसोबतीने अनाथाश्रमांशी जोडले जात, तेथील मुलांना शिक्षण देण्याचे कार्यदेखील त्यांनी केले आणि अल्पवयीन बालसुधार गृहातील लहान मुलांनाही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि जगण्याचा मंत्र शिकवला. तसेच, त्यांच्या मानसिक, वैचारिक बुद्धितमत्तेचा अभ्यास करून त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे कामही लक्ष्मी यांनी केले.

लक्ष्मी यांनी केवळ लहान मुलांनाच शिक्षणाचे धडे दिले नाहीत, तर त्यांना शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांनाही डिजिटली साक्षर केले. ‘एस. आर. दळवी’ या संस्थेसोबत लक्ष्मी यांनी महाराष्ट्राभरातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना संगणकाचे शिक्षण, डिजिटली काम कसे करता येईल, याचे धडे दिले. आधुनिक तंत्रज्ञानाशी महाराष्ट्राच्या तळागाळातील शिक्षकांचीही ओळख व्हावी, या त्यांचा महत्त्वाचा हेतू होता. याशिवाय, लक्ष्मी या प्राणीप्रेमी असून त्या प्राण्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन्समध्येदेखील सहभागी होतात. आत्तापर्यंत बर्‍याच प्राणी-पक्ष्यांचे बचावकार्य त्यांनी केले असून, त्यांना त्यांचे हक्काचे घरदेखील मिळवून दिले आहे.

सामान्यतः सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती फारसे पैसे कमवत नसतील, असा लोकांचा समज असतो. पण, या क्षेत्राबद्दल समाजात फार गैरसमज पसरले असून, त्यांचे खंडण करण्याची जबाबदारी प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची किंवा या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाची आहे, असे लक्ष्मी यांचे मत. कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळी आपण नवखे असतो, तेव्हा आपल्याला त्या क्षेत्राची माहिती, अनुभव घेतच पुढे जायचे असते आणि एकदा आपल्याला ते क्षेत्र समजल्यावर आर्थिक स्थैर्य नक्कीच येते. इतर ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा समाजासाठी काम करणार्‍या नोकरदाराचे आयुष्य तसे थोडे वेगळे असते खरे. कारण, समाजासाठी काम करत असताना जर अपेक्षित बदल आणि मोबदला हवा असेल, तर संयम बाळगणेे फार गरजेचे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या प्रत्येकाने तो संयम ठेवला, तर नक्कीच आभाळ ठेंगणे पडेल, अशी विचारधारादेखील लक्ष्मी लोकांपर्यंत पोहोचवू पाहतात. लहान मुलांना शिक्षण देत एक नवी पिढी घडवणार्‍या आणि सोबतीने प्राणी-पक्ष्यांना घरटे देऊ करणार्‍या लक्ष्मी शिवरामा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0