भाजप सत्तेत असून नरेंद्र मोदी पंतप्रधानही झाले. मात्र, राहुल गांधी आणि त्यांच्या समविचारी लोकांना वाटते की, मोदी नाहीत तर ते स्वतः भारताचे नव्हे, तर जगाचे पंतप्रधान झाले आहेत. सध्या काँग्रेस आणि निधर्मीपणाचा खोटा आव आणणारे तमाम खोटारडे जीव यांना ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला’ आणि त्यात त्याच्या हाती कोलीत हे बोलीभाषेतले एक विधान चपखल बसते की काय, असे सध्या दृश्य. नुकतेच राहुल गांधी म्हणाले की, ”नरेंद्र मोदी संविधान बदलणार होते. पण, आता कमी जागा जिंकल्या म्हणून त्यांनी संविधानाची पूजा केली.” पण, संविधान दिन साजरा करण्याची पद्धत मोदींनीच सुरू केली. इतकेच नाही तर पहिल्यांदा सत्तेत आल्यावर त्यांनी संविधानाला, संसदेला नमनही केले होते. मात्र, राहुल गांधींना हे माहिती असूनही ते खोटं बोलत आहेत. राहुल म्हणाले की, ”तुम्हाला ते (म्हणजे नरेंद्र मोदी) म्हणतील डोसा खाऊ नका. कारण, आम्हाला ते पसंत नाही. अमित शाह म्हणालेत की, तामिळनाडूमध्ये तामिळ बोलू नये, तर हिंदी बोलावे.” खरेतर, हे सगळे १०० टक्के असत्यच. बोलू दे, बोलण्याने काय होते? असा विचार करून सज्जनशक्ती राहुल यांच्या या बोलण्यावर आक्षेप घेणार नाहीत. पण, राहुल गांधींनी अशीच विधाने करून जनतेच्या मनात खोटी भीती भरवली. देशापेक्षा प्रादेशिक अस्मिता टोकदार करण्याचा प्रयत्न केला. ‘जिसकी जितनी आबादी उतना उसका हक...’ म्हणत जातीय संघर्ष माजवण्याचा प्रयत्न केला. वर या सगळ्याला नाव दिले ‘मोहब्बत की दुकान.’ पण, हे ‘मोहब्बत की दुकान’ अल्पसंख्याकांच्या मोहल्ल्यातच चालले. हे दुकान दोन समाजांत जिथे तेढ माजवली गेली होती, तिथेच चालले. हे ‘मोहब्बत की दुकान’ काँग्रेसने वाटलेल्या ‘गरेंटी कार्डवरच्या खोट्या आश्वासनांना लोक जिथे भुलले तिथेच चालले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, इतके सगळे करून काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला, तर मोदींची भाजप २४० जागांवर जिंकली. ९९ पेक्षा ही संख्या जास्तच असते. हार ही ०००००.१ टक्क्यांनी झालेली असेल, तरी ती हारच! मात्र, ‘कधी नाही मिळाले आणि गटकन गिळले’ अशी पण एक म्हण आहे. ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ अशीही एक म्हण आहेच. सध्या राहुल गांधी आणि समविचारी या म्हणी खर्या ठरवताना दिसत आहेत.
दि.९ जून रोजी नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते, तेव्हा कोट्यवधी लोकांनी तो शपथविधी उत्साहाने पाहिला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी काय केले? तर त्यांनी त्यावेळी घरातली सगळी वीज बंद केली. अंधार केला आणि त्या घरात बसून राहिल्या. हे का? तर त्यांचे म्हणणे असे की, नरेंद्र मोदींना जनादेश नव्हता. लोकांनी मोदींना नाकारले. त्यामुळे त्या मोदींचा शपथविधी पाहणार नाहीत. समविचारी पक्षांना सोबतस घेऊन सत्ता स्थापन केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनादेश नव्हता? लोकांनी त्यांना नाकारले? कसे काय? मग २४० जागांवर भाजप उमेदवारांना निवडून देणारे लोक काय भारतीय नाहीत? प्रत्यक्षात ममता बॅनर्जी ज्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्या राज्यात तृणमूल पक्षाला सगळ्या जागांवर १०० टक्के मतदान झाले का? नाही. देशभरातल्या अनेक मतदारसंघांत मतसंख्येच्या दृष्टीने भाजप तिसर्या आणि दुसर्या जागेवर होता. अगदी शेपाचशेच्या तफावतीनेही भाजप जागा हरला आहे. मग, त्या ठिकाणी भाजपला मत देणारे कोण होते? ते भारतीय नव्हते का? हाच सत्य आणि तर्कसुसंगत विचार आहे. मात्र, राहुल गांधी असू देत, प्रियांका गांधी असू देत की ममता बॅनर्जी की शरद पवार की उद्धव ठाकरे, ते सर्रास म्हणतात की, ’भाजप हरली, मोदींना जनतेने नाकारले.’ हे कसे काय? ४०० जागा मिळवणे हे भाजपचे स्वप्न जरुर होते. पण, कमी जागा मिळवून सत्ता स्थापन केली, यातच सारे काही आले. संसदेमध्ये भाजप आणि समविचारी पक्षांची रालोआ आघाडी ही सत्ताधारीच असणार आहे आणि विरोधी पक्षाच्या बाकावर राहुल गांधी आणि समविचारी पक्षांनाच बसावे लागणार आहे. राजकारण म्हणजे बहुमताचा खेळ. तूर्तास बहुमत भाजप आणि समविचारी पक्षांकडे आहे. सत्ता देशासाठी, समाजासाठी कशी राबवावी, याचे सूत्र नरेंद्र मोदींना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे ममतांना ज्या रामनामाची अॅलर्जी आहे, त्या रामनामाला साक्षी ठेवून मोदी सत्ताकारणातून सेवाकारण करणारच! बाकी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचा शपथविधी पाहिला काय आणि ना पाहिला काय? कोंबडं झाकलं म्हणून आरवायचं राहत नाही. मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले, हे सत्य कितीही नाकारले तरी तेच सत्यच!