नाशिक: कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची नाशिक व्हाया अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात निर्यात झाली आहे. चालू हंगामात आतापर्यंत एक हजार टन आंबा निर्यात करण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन दि.1 एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली. पहिल्याच महिन्यात 7 हजार, 500 बॉक्समधून 28 टन आंबा अमेरिकेला निर्यात झाला.
भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा आंबा चवीला उत्कृष्ट असल्याने जगभरातून मागणी वाढली असल्याचे कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले. हापूस आंब्याची ही परदेशवारी लासलगावमार्गे झाली असून, दि. 1 एप्रिल ते दि. 12 जून या तीन महिन्यांच्या कालावधीत जगभरातील खवय्यांना भूरळ घालणारा एक हजार टन आंबा निर्यात झाला. तसेच पुढील काळात आणखी 50 ते 60 टन आंबा निर्यात होणार आहे. दरम्यान, मागील वर्षी एकट्या अमेरिकेत 1 हजार, 23 टन आंब्याची निर्यात लासलगाव येथील कृषक केंद्रामधून झाली होती.
...या आंब्यांची होते निर्यात
मागील 15 वर्षांपासून हापूस अमेरिकेमध्ये पाठवला जातो. अमेरिकेने ठरवून दिलेले मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतातून आंब्याची मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातींच्या आंब्यांवर विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेबरोबरच, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया या देशांच्या सीमा ओलांडून आपला आंबा कूच करू लागला आहे.
इतरही वाण होतात निर्यात
सुरुवातीच्या कालखंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लासलगाव येथे उभारलेले कृषी उत्पादन संशोधन केंद्र कांद्यासाठी तयार करण्यात आले होते. परंतु, आता कांद्याबरोबरच डाळी, कांदा पावडर, मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदिक चूर्ण, कलर पेंट, ड्राय भाजीपाला यावर विकिरण केले जाते. आता दरवर्षी सरासरी चार हजार मेट्रिक टन मालाची कृषकमध्ये विकिरण प्रक्रिया पार पाडली जाते.