मलबारी कवड्या धनेशाने केली पिंगळ्याची शिकार; दुर्मीळ घटनेची कोकणातून नोंद

12 Jun 2024 16:27:29
malabar pied hornbill



मुंबई (प्रतिनिधी) -
मलबारी कवड्या धनेश (malabar pied hornbill) पक्ष्याने जंगली पिंगळ्याची (jungle owlet) शिकार केल्याची दुर्मीळ नोंद संगमेश्वर तालुक्यातील पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. तालुक्यातील तुरळ येथून ही नोंद करण्यात आली आहे (malabar pied hornbill). मलबारी कवड्या धनेशाला सर्वसामान्यपणे फलाहारी पक्षी म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत त्याने केलेली पिंगळ्याची शिकार अधोरेखित करण्यासारखी नोंद आहे. (malabar pied hornbill)
 
 
महाराष्ट्रातील सह्याद्रीत प्रामुख्याने धनेशाच्या चार प्रजाती आढळतात. यामध्ये भारतीय राखी धनेश, मलबारी राखी धनेश, मलबारी कवड्या धनेश आणि महाधनेश यांचा समावेश होतो. यामधील रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने मलबारी कवड्या धनेश आणि महाधनेश या दोन प्रजाती नजरेस पडतात. देवरुखच्या 'सह्याद्री संकल्प सोसायटी'कडून या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथून मलबारी कवड्या धनेशाच्या लक्षवेधी वर्तनाची नोंद करण्यात आली आहे. प्रामुख्याने धनेश पक्षी हे फळे खाणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. मात्र, विणीच्या हंगामात ढोलीतील मादीला आणि पिल्लाला प्रथिने मिळावे म्हणून ते पक्षी आणि सरपटणाऱ्या जीवांची शिकार देखील करतात. ढोलीतील मादीला नर धनेशाकडून साप, सरडे, उंदीर, वटवाघूळ, खारुताई, छोटे पक्षी असे प्रथिनयुक्त जीव भरवातानाची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. पक्ष्यांमध्येही नर धनेश हा मादी आणि पिल्लांसाठी तांबट, कवडा, पिल्लं आणि त्यांची अंडी अशा गोष्टींची तजवीज करतो.
 
 
मलबारी कवड्या धनेश पक्ष्याने जंगली पिंगळ्याची शिकार केल्याची नोंद तुरळमधील 'रस्टिक हाॅलिडेज'च्या आवारातून करण्यात आली आहे. 'रस्टिक हाॅलिडेज'चे नितीन करकरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा एमटीबी) बोलताना सांगितले की, "आमच्या आवारात मलबारी कवड्या धनेश पक्ष्याची दोन घरटी आहेत. काही दिवसांपूर्वी हा नर मलबारी कवड्या धनेश पक्षी छोट्या पक्ष्यांच्या मागे लागल्याचे आम्ही पाहिले. निरीक्षणावेळी त्याने आमच्यासमोरच जंगली पिंगळ्याला धरले. कॅमेरा आणून त्याचे छायाचित्र टिपेपर्यंत धनेशाने पिंगळ्याचा फडशा पाडला होता. त्यानंतर तो पिंगळ्याला चोचीमध्ये धरुन उडून गेला." पावसाळा सुरू झाला असला तरी, यंदा धनेश पक्ष्याचा विणीचा हंगाम विलंबाने सुरू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत घरट्यामधील पिल्लाला भरवण्यासाठीच या नर धनेशाने पिंगळ्याची शिकार केल्याची शक्यता आहे. यापूर्वी महाधनेशाने अशा प्रकारे पिंगळ्यांच्या शिकार केल्याच्या नोंदी आहेत. पिंगळा म्हणजे एक प्रकारचे घुबडच. आकाराने मोठं असत ते घुबड आणि लहान आकारच घुबड म्हणजे पिंगळा. राज्यात पिंगळ्याच्या तीन प्रजाती आढळतात.


Powered By Sangraha 9.0