नवी दिल्ली : कुवैतमधील मंगफ येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय लोकांचा समावेश असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिण मंगफमधील आग दुर्घटनेत मृत पावलेले भारतीय केरळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
दरम्यान, कुवैत येथील आग दुर्घटनेवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दुःख व्यक्त केले असून यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एस जयशंकर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली असून ते म्हणाले, कुवेत शहरातील आगीच्या वृत्तामुळे खूप धक्का बसला. ४० हून अधिक मृत्यूमुखी तर ५० हून अधिक रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
ते पुढे म्हणाले, भारतीय राजदूत कम्पमध्ये दाखल झाले असून यासंदर्भात अधिक माहिती लवकरच मिळेल. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना तसेच, जखमींना दूतावास या संदर्भात संपूर्ण मदत करेल, असेही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.