देहबुद्धी सोडली तर ज्ञानप्राप्ती

12 Jun 2024 21:49:14
knowledge


सर्वसाधारणपणे ज्ञान आणि अज्ञान या दोन कल्पना आपल्या परिचयाच्या आहेत. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. समर्थ ज्ञान व अज्ञान या कल्पनांशी न थांबता वेगळा विचार करतात. यातून स्वामींनी विपरित ज्ञानाची कल्पना मांडली आहे.


समर्थांनी मागील श्लोक क्रमांक १३७ मध्ये सांगितले आहे की, ज्ञानी, संत, महात्मे यांनी त्यांच्या साधनेतून, तपस्येतून, चिंतनातून मिळविलेले ज्ञान कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे जगापुढे मांडले. या पुण्यपुरुषांनी सढळ हाताने ज्ञानदान केले. सर्वसाधारणपणे दान करणारी व्यक्ती स्वतःजवळ हातचे राखून उरलेले दान करीत असते. परंतु, या ज्ञानी संतमहात्म्यांनी ज्ञानदान करताना सर्व ज्ञान जगाला दान करून टाकले आहे. असे असूनही अज्ञानी जीव आहे तेथेच राहिले. त्यांची उन्नती झालेली दिसत नाही. त्यांना या ज्ञानदानाचा फायदा झालेला दिसत नाही. या पुरातन ज्ञानाची अनुभूती अज्ञानी जीवांना येत नाही. त्यांचे अज्ञान जराही कमी झालेले दिसत नाही. हा विचार समर्थांनी मागील श्लोकाच्या पहिल्या दोन ओळींत मांडला आहे. (परी जीव अज्ञान तैसेचि ठेले।) याची कारणमीमांसा करताना समर्थ सांगतात की, ‘मी देहच आहे आणि माझी सुखदुःखे,माझा आनंद देहावर अवलंबून आहे,’ असे ठामपणे मानणार्‍या देहबुद्धीधारी लोकांना आपल्या अज्ञानातून घडणारे कार्य खोटे आहे, हेच मुळी समजत नाही. अशा अज्ञानी, अहंकारी व देहबुद्धीत अडकलेल्या जीवांना अनादी कालापासून चालत आलेला हा ज्ञानाचा ठेवा, आनंदाचा ठेवा कसा समजणार?
 
ज्ञानी पुरुषांनी आपल्या साधनेतून, तपस्येतून आत्मा व देह यांचे विवरण केले आहे. प्रपंचातील खेळांच्या हालचालींसाठी आत्म्याला देहाची आवश्यकता असते. देहाच्या साहाय्याने आत्मा या जगात वावरत असतो. त्यामुळे देहाला नको तेवढे महत्त्व प्राप्त होते. अशा चुकीच्या समजुतीमुळे माणूस देहावर आत्म्याच्या ठायीच्या गुणांचा आरोप करतो आणि देहाला अपरंपार महत्त्व मिळवून देतो, आपले सुखदुःख आनंद देहाशी जोडून टाकतो. त्यामुळे मी देहच आहे, या देहापलीकडे माझे अस्तित्त्व नाही, असे तो ठामपणे समजतो. याला ‘देहबुद्धी’ असे म्हणतात. वस्तुतः ज्ञानी पुरुषांच्या सांगण्यानुसार आत्मवस्तू किंवा ब्रह्मवस्तू हे आपलेच आनंदी स्वरुप असल्याने ते नित्यप्राप्त आहे. तथापि आत्मस्वरुप आपण वेगळेपणाने पाहू शकत नाही. आपण ब्रह्मवस्तू पाहायचे ठरवले, तर ब्रह्मवस्तूला पाहणारा तिच्यापेक्षा कोणीतरी वेगळा असला पाहिजे, हा वेगळा कोण आहे, याचा निर्णय करता न आल्याने चमत्कारिक स्थिती उद्भवते असे स्वामींनी दासबोधात स्पष्ट केले आहे. आत्मसुख हे मूलतः सर्वांना सहजप्राप्त असूनही माणूस देहबुद्धीच्या आहारी गेल्याने देहातून किंवा देहासाठी सुखप्राप्ती मिळवता येईल, या आशेवर सतत खटपट करीत असतो. परंतु, ते सारे व्यर्थ जाते.

देहाद्वारा सुखप्राप्तीचा आभास निर्माण झाला, तरी त्याने माणूस तृप्त होत नाही. त्याची सुखप्राप्तीची लालसा वाढत जाते. आनंदाची समाधानाची अवस्था माणसाच्या मूळ आत्मस्वरुपात साठवलेली आहे. ती पूर्वापार म्हणजे उपजत आहे. त्या समाधानाचा कितीही अनुभव घेतला तरी ते संपणारे नाही. हा आत्मसुखाचा झरा अखंड वाहणारा असूनही माणसाला देहबुद्धीमुळे, अहंकारामुळे तो सहजासहजी गवसत नाही. कारण, माणसाने खोट्या ‘मी’ला सर्वस्व मानलेले असते. अहंकार व देहबुद्धी हे खरे मानल्याने विचार, बुद्धी, तर्क खर्‍या ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ही अवस्था कशी असते, हे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.


भ्रमे नाडले वित्त तें गुप्त जालें।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें।
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।
जुनें ठेवणें मीपणे आकळेंना॥१३८॥

आपला आनंद आपल्या ठिकाणी असूनही जीवाला भ्रांती पडल्याने तो आनंदाचा ठेवा सापडत नाही. त्यामुळे जीव आपले आयुष्य दुःखात व्यतीत करतो. हे स्वामी या श्लोकात एका दृष्टांताद्वारे सांगत आहेत. स्वामी म्हणतात की, समजा एखाद्या माणसाने आपले धन कोठेतरी लपवून ठेवले आणि त्याला ते सापडत नाही. धन जवळपास असूनही भ्रम निर्माण झाल्याने तो आपले आयुष्य दारिद्य्रात घालवतो. हे सारे आपले धन हरवले आहे, या भ्रमातून घडले आहे. समर्थांनी दासबोधात भ्रम कल्पनेवर एक समास लिहिला आहे. भ्रम झाल्याने माणूस सत्यापासून दूर जातो. यासाठी भ्रमाची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे ज्ञान आणि अज्ञान या दोन कल्पना आपल्या परिचयाच्या आहेत. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. समर्थ ज्ञान व अज्ञान या कल्पनांशी न थांबता वेगळा विचार करतात. यातून स्वामींनी विपरित ज्ञानाची कल्पना मांडली आहे. समर्थ दासबोधात सांगतात की, वस्तू जशी आहे तशी ती न ओळखणे किंंवा जशी नाही तशी ती आहे असा आभास निर्माण होणे, याचा अर्थ विपरित ज्ञान. थोडक्यात सांगायचे तर, वस्तू मुळात जशी आहे तशी न पाहता, आपल्या मनातील कल्पना त्या वस्तूवर लादून विकृत पद्धतीने अथवा चुकीच्या पद्धतीने ती पाहणे आणि तेच खरे आहे असे सांगणे, याला विपरित ज्ञान म्हणतात.


मानवी स्वभावाने अहंकार सुटत नाही. त्या अहंकाराने अहंभावाने विपरित ज्ञान हे खरे ज्ञान मानण्याकडे प्रवृत्ती होते. तोच भ्रम होय. दासबोधाच्या दशक दहा, समास सहामध्ये स्वामींनी प्रापंचिक भ्रमाची अनेक उदाहरणे दिली आहेत. स्वामी म्हणतात, ‘उदंड भ्रम विस्तारला‘ अज्ञानी जनात अनेक भ्रम इतक्या मोठ्या प्रमाणात पसरले आहेत की त्याला सीमा नाही. भ्रमचर्चेचा उद्देश असा की, दृश्यातील फोलपणा बाजूला सारून अतींद्रिय परब्रह्माचा अनुभव घ्यावा. मी देह आहे आणि माझे सुखदुःख देहावर अवलंबून आहे, असा ठाम निश्चय, भ्रम झाल्याने देहबुद्धी पक्की होते व माणूस पूर्वापार चालत आलेल्या आत्मज्ञानाला मुकतो. वास्तविकपणे पाहता ज्ञानी महात्म्यांनी जे आत्मज्ञान सांगितले त्यानुसार, ‘मी आनंदस्वरुप आहे. चैतन्य हे माझे खरे रुप असून मी अविनाशी आहे. मला आदी अथवा अंत नाही,’ असे असूनही देहबुद्धीच्या भ्रमात अडकल्याने ते सत्यज्ञान जीवापर्यंत पोहोचत नाही. अज्ञानी जीव ज्ञानाच्या बाबतीत दरिद्रीच राहतो. भ्रामक देहबुद्धीचा निश्चय जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत हे पुरातन आत्मज्ञान (जुने ठेवणे) माणसाला समजत नाही. तसेच ‘मी’पणाच्या अहंकाराने हा आनंदाचा साठा जवळ असूनही आपण त्याला दुरावतो. आपल्या अंतरंगातील ज्ञानाची शक्तीची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागल्यास आपण समाधानी जीवन व्यतीत करू शकतो, हा सकारात्मक संदेश स्वामींच्या विचारातून मिळतो.


Powered By Sangraha 9.0