प्रशांतचे ‘सृष्टीज्ञान’

12 Jun 2024 22:13:02
Prashant Shinde

मुंबईनगरीत जन्मलेले, समाजघटकांसाठी काम करण्याच्या दृष्टीने उचललेलं पाऊल पर्यावरण शिक्षणाकडे वळलं. असं कोणतं वळण त्यांना या ठिकाणी घेऊन आलं? ‘सृष्टीज्ञान’चे संस्थापक प्रशांत शिंदे यांच्या प्रवासाविषयी...
 
'सृष्टीज्ञान’ या संस्थेच्या माध्यमातून गेली २४ वर्षं सातत्याने पर्यावरणाविषयी जनजागृती आणि पर्यावरण शिक्षणासाठी कार्यरत प्रशांत शिंदे यांचा जन्म मुंबईतलाच. दादरच्या नायगाव येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले प्रशांत. त्यांची आई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका, तर वडील नेव्हल डॉकमध्ये ‘स्टोअर किपर’ म्हणून कार्यरत होते. त्यामुळेच प्रशांत यांच्यावर पहिल्यापासूनच आधुनिक विचारांचे संस्कार झाले. वाचन, चांगले सिनेमे पाहणं, शिवाजी पार्कच्या मैदानावर खेळणं, चित्रपटगीते ऐकणं असे त्यांचे बालपण एकूणच सुखावह गेले. ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या ‘कॉलेज ऑफ सोशल वर्क’मधून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘बीएसडब्ल्यू’ आणि ‘एमएसडबल्यू’चे शिक्षण त्यांनी घेतले. समाजघटकांसाठी जमेल ते कल्याणकारी काम करायचं, हे ठरवल्याप्रमाणे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रारंभीच्या काळामध्ये मेळघाटच्या जंगलातील आदिवासी समाजासाठी त्यांनी काम केलं. तिथे पहिल्यांदा जंगल परिसंस्थेशी त्यांची ओळख झाली.

 पर्यावरणीय परिसंस्थेशी झालेली ही ओळख, त्यातून आकलन झालेली जैवविविधता याचे कुतूहल निर्माण होत गेलं आणि पुढे त्यांनी यामध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातूनच त्यांनी ‘सृष्टीज्ञान’ नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. २००१ साली स्थापन केलेल्या ‘सृष्टीज्ञान’ या संस्थेचे प्राथमिक उद्देश मराठी भाषेतून पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती इतकेच होते. पण, जसजशी संस्था आकार घेऊ लागली, तसतसा तिचा कामाचा आवाका वाढू लागला. २० वर्षांपेक्षा अधिक काळ या संस्थेने पर्यावरण शिक्षणासाठी विविध शाळांमध्ये जाऊन तेथील मुलांशी संवाद साधत त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे काम केले. दुर्लक्षित आणि दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनासाठी ‘सृष्टीज्ञान’च्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. सध्या जगाला भेडसावणार्‍या तापमानवाढ आणि वातावरण व हवामान बदलाच्या समस्येवरही ‘सृष्टीज्ञान’ ही संस्था ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’ या स्विडिश संस्थेबरोबर करार करत काम करत आहे.

राज्यभर त्यांचे कार्य सुरू असून कोकण पट्ट्यात संस्थेचे बरेच काम झाले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कांदळवन वृक्षांची लागवड करत, त्यांचे संवर्धन करून ते क्षेत्र पुन्हा राज्याच्या ताब्यात देण्यात आले. याच पद्धतीने मियावाकी जंगलांच्या माध्यमातून संवर्धनासाठी ‘सृष्टीज्ञान’ने प्रयत्न केले आहेत. रत्नागिरीतील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ या संस्थेबरोबर ‘महाधनेश’ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तसेच त्यांच्या अधिवास संरक्षणासाठी ‘सृष्टीज्ञान’ काम करत आहे. मुंबईतील शिवडी माहूल खाडीमध्ये फ्लेमिंगोसाठी काम, रायगडच्या फणसाड अभयारण्यात गिधाड संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे. प्रदेशनिष्ठ धान्यांच्या बियांचे कलेक्शन तयार केल्यामुळे त्याचा स्थानिक शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. तसेच या प्रदेशनिष्ठ बिजांची प्रदर्शने भरविण्यात आली आणि त्यांची विक्रीही केली गेली आहे. प्रदेशनिष्ठ बिजांबरोबरच मिलेट्स म्हणजेच भरडधान्यांच्या संवर्धनासाठी भरडधान्यांची शेती करणार्‍या महिलांना ‘डॉटर्स ऑफ द अर्थ’ या प्रकल्पांतर्गत एकत्र आणले गेले, तर ज्या महिला या भरडधान्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहक म्हणून येत असत, त्यांचा ‘मिलेट मॉम्स क्लब’ तयार करण्यात आला. या माध्यातून भरडधान्यांचे संवर्धन आणि आहारामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.

सिंधुदुर्गातील तांबलदेग आणि रामेश्वर या गावांमध्ये १७ एकरांच्या किनारी भागामध्ये ३० हजार कांदळवन वृक्षांची नर्सरी तयार करण्यात आली आहे. याचबरोबर ‘सृष्टीज्ञान’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सोबत घेऊन रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील परश्रामवाडी येथे देवराई निर्माण तयार करण्यात आली. यामध्ये २५ प्रजातींच्या ३०० रोपांची लागवड करण्यात आली असून, त्याचे योग्यरितीने संवर्धनही झाले. ‘सृष्टीज्ञान’ संस्थेच्या माध्यमातून इतका प्रदीर्घ काळ आणि विविधांगी प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यावरणाचे काम करण्यात आलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक शाळांमध्ये आजवर १००हून अधिक उपक्रम राबविलेल्या या संस्थेशी दहा हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत, हे संस्थेचे यशच म्हणावे लागेल. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये झालेली जनजागृती पर्यावरण शिक्षणामध्ये चांगले बदल घडवून आणित आहे. पर्यावरण संवर्धन ही फक्त चर्चा करायची गोष्ट नसून, आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सामाजिक तारतम्य बाळगून आणि वैयक्तिक जबाबदारी मानून, समाजातील प्रत्येक घटकाने आपल्यासाठी आणि येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी ते प्रत्यक्षात साध्य करणे, ही अत्यंत आवश्यक बाब आहे, असा संदेश ते सामान्यांना देतात. त्यांच्या या प्रामाणिक कष्ट आणि दीर्घ समाजोपयोगी कार्यासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Powered By Sangraha 9.0