संविधान साक्षरतेला पर्याय नाही!

12 Jun 2024 20:29:18
Constitution literacy


आपल्याला ज्यांच्याशी लढायचे आहे, ते मायावी लोकं आहेत. ७५ वर्षे खोटा प्रचार करण्याची कला आणि शक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई सर्वांची लढाई आहे. संविधानाविषयी जर खोटा प्रचार करून आपल्या समाजबांधवांची दिशाभूल ते करू शकतात, तर, सत्याचा पक्ष घेऊन आणि सत्याचं नाणं खणखणीत वाजवून त्याचा प्रतिकार आपणही करू शकतो. फक्त त्यासाठी राजकीय अंगाने का होईना, पण संविधान साक्षर होणं ही काळाची नितांत गरज आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या निवडणुकीत आपण फक्त तीन पक्षांशी नाही, तर चार पक्षांशी लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा प्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही. किंबहुना, आपण त्याला रोखण्यासाठी तयारी करू शकलो नाही. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार, हा विषय इतका खालपर्यंत गेला की, त्याचा परिणाम निकालांवर झाला. पहिल्या तीन टप्प्यांपर्यंत आपण गाफील राहिलो. त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांपैकी केवळ चार ठिकाणी आपल्याला यश मिळाले. दलित, आदिवासी समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात झाला.” देवेंद्र फडणवीस हे झुंजार, लढाऊ आणि पारदर्शी नेते असल्यामुळे वस्तुस्थिती मांडत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची अपराधबोधाची भावना ठेवली नाही. ‘संविधान बदलण्याचा खोटा नॅरेटिव्ह चालविला गेला’ हे त्यांचे वाक्य संविधानाचा एक अभ्यासक म्हणून मला अंतर्मुख करून गेले. सा. ‘विवेक’ने भारतीय संविधानावर आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांतून भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून संविधानातील सिद्धांत आणि मूल्ये यावर अतिशय सोप्या भाषेत भाष्य करण्यात आले आहे. सामान्यांतील सामान्य माणसालादेखील पुस्तकं वाचून संविधान काय आहे, हे उत्तम प्रकारे समजू शकते. त्याचबरोबर ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया या चार देशांचा संविधानिक इतिहास सांगणारी चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातूनही जगातील प्रमुख देशांच्या संविधानांचा परिचय होतो.

या सर्व पुस्तकांची सा. ‘विवेक’च्या प्रतिनिधींमार्फत फार मोठ्या प्रमाणात विक्रीही झाली. ‘विवेक’ वाचकांचा त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला. अनेक संघ कार्यकर्त्यांनी काही पुस्तकं पाच-दहा ते वीसच्या पटीत विकत घेतली आणि संबंधितांना ती वितरीत केली. यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांचे. त्यांनी पुढाकार घेऊन लातूरला अधिवक्ता परिषदेच्या सर्व अधिवक्तांपुढे ‘संविधान’ विषय मांडण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो. या पुस्तक प्रकाशनाचा खटाटोप सा. ‘विवेक’ने व्यवसाय करण्यासाठी केला नाही. पुस्तकाचा लेखक मी आहे. ही पुस्तकं लिहिण्यासाठी मी आठ ते नऊ वर्षे प्रचंड मेहनत घेतली. वाचनाचे सर्व विषय बाजूला ठेवून केवळ ‘संविधान’ या विषयाच्या अभ्यासासाठी मी स्वत:ला गाढून घेतले. हे काम मला कोणी सांगितले नाही. माझे मलाच वाटले की, इथून पुढच्या कालखंडात ‘संविधान’ हा विषय राष्ट्रीय चर्चेचा, अतिशय महत्त्वाचा विषय राहाणार आहे. तो महत्त्वाचा राष्ट्रीय विषय राहाणार असल्यामुळे या विषयाचा सर्वांगाने नीट अभ्यास केला पाहिजे. आपण ज्या विचारधारेत जगतो, ती विचारधारा संविधानविरोधी आहे, दलितविरोधी आहे, हा नवा ‘नॅरेटिव्ह’ नाही. मला राजकीय समज आल्यापासून मी याविषयी कायमच ऐकत आलो आहे. ३०-४० वर्षांपूर्वी हे विषय एवढे टोकदार झालेले नव्हते. आता ते टोकदार बनत गेलेले आहेत. ज्यांनी हे विषय टोकदार बनविलेले आहेत, ते राजकीय व्यूहरचनेतील प्रशांत किशोर आहेत. म्हणजे प्रशांत किशोर यांचं डोकं जसं चालतं, तसं कमी-अधिक डोकं चालणारी ही मंडळी आहेत.

 
दलित वर्गाची जनसंख्या सर्व भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. निवडणूक अंकगणिताच्या संदर्भात सांगायचे तर दलित मते अनेक विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रांत निर्णायक ठरतात. त्यांना ‘जिंकून देणारी मतं’ असं राजकीय भाषेत म्हणतात. सर्व दलित वर्गात संविधानाविषयी पुढील भावना आहेत.


पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे संविधान आहे.
या संविधानाने आम्हाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय संरक्षण दिलेले आहे.
या संविधानाने मनुचे कायदे समाप्त करून स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित कायद्याचे राज्य निर्माण केले आहे.
जोपर्यंत हे संविधान अस्तित्वात आहे, तोपर्यंत आम्हाला संरक्षण प्राप्त होणार आहे.
संविधानातील बदल म्हणजे, आमच्या माथी पुन्हा अस्पृश्यता आणि वंचितता येईल.

 ही गोष्ट खरी आहे की, आपल्या संविधानाचे निर्माते पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयीवर संविधानाची रचना उभी आहे.समाजातील दुर्बळ घटकांना या संविधानाने सर्व प्रकारचे संरक्षण दिले आहे आणि ही गोष्ट देखील खरी आहे की, वंचित वर्गाचा विचार करता ‘संविधान’ हा त्यांच्यादृष्टीने अतिशय श्रद्धेचा आणि धर्मग्रंथासारखा पवित्र विषय आहे. दलित, वंचित वर्गाचा विषय थोडा बाजूला ठेवला तरी, भारतीय संविधान हे भारताचा विचार करता अतिशय उत्कृष्ट संविधान आहे. या संविधानाने गेल्या सुमारे ७५ वर्षांत सर्व देशभर या भावना निर्माण केल्या आहेत-

 
एक भारतीयत्वाची भावना
एक राष्ट्रीयत्वाची भावना
समान राष्ट्रीय आकांक्षांची भावना
वेगाने सामाजिक सुधारणा घडवून आणण्याची भावना
आपल्याला लोकशाही व्यवस्थेतच जगायचे आहे, ही भावना
संसदीय लोकशाहीचा अंगिकार
कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला पूर्णपणे नकार

ही वस्तुस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चार-दोन नेत्यांच्या लक्षात येते. परंतु, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सभासद (भाजपचे) यांचे या बाबतीतकिती प्रशिक्षण झाले? मी भाजपचा पदाधिकारी नसल्यामुळे या बाबतीत मी आकडेवारी देऊन काही सांगू शकत नाही. परंतु, अनेक कार्यकर्ते भेटतात, त्यांच्याशी बोलणं होतं आणि मग लक्षात येतं की, अशा प्रशिक्षणाच्या बाबतील अंधार आहे, असं म्हटलं तरी चालेल. ‘विवेक’चे प्रतिनिधी अनेक खासदार आणि आमदारांना भेटले. ‘संविधान’ पुस्तकांच्या विषयी त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगितले. गाव पातळीवरचा नगरसेवकही आपल्याला महान नेता समजत असतो. अशी सर्व लोकं उत्तर देतात की, ‘विचार करू. नंतर सांगू. नंतर भेटा.’ याचा अर्थ असा होतो की, ‘आम्हाला याची काही गरज नाही, तुम्ही वारंवार आमच्याकडे येऊ नका. तुमचाही वेळ वाया घालवू नका आणि माझाही वेळ वाया घालवू नका.’


त्यामुळे ‘संविधान’ हा विषय सर्व राजकीय कार्यकर्त्यांचा आणि लोकप्रतिनिधींच्या अभ्यासाचा गंभीर विषय झाला पाहिजे. अभ्यासासाठी ‘विवेक’ची पुस्तकं घेतली पाहिजेत, त्यासाठी हा लेख नाही. बाजारात ‘संविधाना’वर इंग्रजीत अप्रतिम पुस्तकं आहेत. त्यांचाही अभ्यास केला जाऊ शकतो. पक्ष चार-दोन नेत्यांमुळे चालत नाही. एकटा राम रावणाशी लढू शकत नाही, बरोबर वानरसेना लागते. एकटे छत्रपती शिवाजी महाराज मुघल आणि सुलतानाशी लढू शकत नाहीत, बरोबर मावळे लागतात. ते चिकट, चिवट, विचारनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ असावे लागतात. सेनापती नेतृत्व करतो आणि सैन्य प्रत्यक्ष रणांगणावर लढत असते. आपल्याला ज्यांच्याशी लढायचे आहे ते मायावी लोकं आहेत. ७५ वर्षे खोटा प्रचार करण्याची कला आणि शक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई सर्वांची लढाई आहे. संविधानाविषयी जर खोटा प्रचार करून आपल्या समाजबांधवांची दिशाभूल ते करू शकतात, तर, सत्याचा पक्ष घेऊन आणि सत्याचं नाणं खणखणीत वाजवून त्याचा प्रतिकार आपणही करू शकतो. फक्त त्यासाठी राजकीय अंगाने का होईना, पण संविधान साक्षर होणं ही काळाची नितांत गरज आहे. लेखाची भाषा काही जणांना थोडी कडक वाटेल. पण, इथे कोणाचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचे तर, क्षमावे तुळजामाते, माझे आतुर बोलणे।






Powered By Sangraha 9.0