"लहानपणापासूनच त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने दहावीनंतर महागडे क्लासेसही लावलेत. बारावीची परिक्षा आणि डॉक्टर बनण्यासाठी नीटची (NEET Exam) तयारी या दोन्ही गोष्टी त्याने उत्तमरितीने सांभाळल्या होत्या. नीटच्या परिक्षेचा दिवस उजाडला आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो परिक्षा केंद्रावर पोहोचला. मन लावून पेपरही सोडवला. त्यानंतर निकाल आला आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. मात्र, तरीही त्याला त्याच्या मनाजोग्या शासकीय विद्यालयात मध्ये अॅडमिशन मिळणार नव्हती. का? त्याचा अभ्यास कमी पडला? की, त्याच्याकडे पैसे नव्हते? तर नाही. याचं कारण म्हणजे परिक्षेतच घोळ झाला आणि तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळालेत. त्यामुळे आता स्पर्धा वाढली. मग त्याने अभ्यास करुन मिळवलेल्या चांगल्या मार्कांचं काय?" असाच प्रश्न सध्या देशभरातील डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालाय. संपुर्ण देशभरात सध्या नीट परिक्षेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यावर्षी नीट परिक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांसह पालक रस्त्यावर उतरलेत. एवढंच नाही तर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलंय. तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि नीट परिक्षेत कोणता घोटाळा झालाय? हे आपण जाणून घेऊया.
दि. ५ मे रोजी देशभरात नीटची परीक्षा घेण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजेंसी म्हणजेच एनटीएद्वारे नीटची परिक्षा घेतली जाते. देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी ही परिक्षा घेण्यात येते. त्यानंतर ४ जून रोजी या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आणि परिक्षेत गडबड झाल्याचा प्रकार पुढे आला. महत्त्वाची बाब म्हणजे, या परिक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणार होता. परंतू, एकीकडे देशभरात लोकसभेच्या निकालाची धामधूम असताना १० दिवस आधीच म्हणजे ४ जूनलाच हा निकाल जाहीर करण्यात आलाय.
या निकालानंतर एनटीए विद्यार्थ्यांना छुप्या पद्धतीने वैद्यकीय शिक्षणात प्रवेश देत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय. शिवाय परिक्षेत १ हजार ५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले असून मार्क देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. नीटच्या परिक्षेत ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० मार्क मिळालेत. गेल्या वर्षी देशभरातून फक्त दोनच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते. त्यामुळे यावेळी हे प्रमाण इतकं मोठं कसं? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. विशेष म्हणजे या ६७ विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी हे हरियाणातील एकाच परिक्षा केंद्रावरील आहेत.
नीटच्या परिक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते. म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता १ मार्क कापला जातो. यावर्षी झालेल्या परिक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धतीवरही संशय व्यक्त करण्यात आलाय. ६७ टॉपर विद्यार्थांच्या खालोखाल असलेल्या विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७१८ आणि ७१९ असे मार्क मिळाले आहेत. परंतू, तज्ञांच्या मते, असं होणं शक्य नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवले आणि समजा त्याचं एक उत्तर चुकलं तर त्याला नियमानुसार ७१५ मार्क मिळायला हवेत. ते कसं? तर नीट परिक्षेतील निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार एक प्रश्न चुकल्यास १ मार्क कापला जातो. यानुसार मुळ प्रश्नाचे ४ गुण आणि उत्तर चुकल्यामुळे कापला जाणारा १ गुण असे एकुण ५ गुण एका चुकलेल्या प्रश्नासाठी कापले जातात. पण मग यावेळी विद्यार्थ्यांना ७१८ आणि ७१९ गुण कसे मिळालेत? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय.
दुसरीकडे, एनटीएने विद्यार्थ्यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत एनटीएने स्पष्टीकरण दिलंय. संबंधित परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि अधिकाऱ्यांच्या तथ्यात्मक अहवालाच्या आधारे वेळेत पेपर सोडवता न आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच ७१८ आणि ७१९ मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थांचे गुणही ग्रेस मार्कमुळे वाढले असल्याचं सांगण्यात आलंय.
मात्र, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. काही विद्यार्थ्यांनी नीट परिक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत परिक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीये. एनटीए विद्यार्थ्यांना छुप्या पद्धतीने वैद्यकीय शिक्षणात प्रवेश देत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेमध्ये केलाय. मंगळवारी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी एनटीएला नोटीस जारी करत यावर उत्तर मागितलंय. शिवाय येत्या ८ जुलै रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणावर महाएमटीबीने इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ. गिरीश लाड यांच्याशी संपर्क साधला. यावर ते म्हणाले की, "नीट ही परिक्षा अत्यंत कठीण आहे आणि मुलं खूप कष्टाने ती देत असतात. यावर मुलांचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे जर कुठल्याही शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारे गैरव्यवहार होत असल्यास त्याबद्दल सखोल चौकशी करून यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. ही मुलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य आहे आणि अशा गैरव्यवहारामुळे आपली आरोग्य व्यवस्था ढासळली जाईल. ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांनी त्यांच्या पदरात यश पाडून घ्यायलाच हवं. पण अशा प्रकारचे गैरव्यवहार थांबण्यासाठी सर्वात आधी माणसाची माणसिकता बदलायला हवी. आपल्या देशामध्ये परीक्षा आणि निकालाच्या प्रक्रियेत भरपूर सुधारणा झालेली आहे. त्यामुळे सगळं सुरळीत सुरु असताना कुणीही स्वत:च्या क्षुल्लक स्वार्थासाठी देशाचं नुकसान करु नये. कुठल्याही परिक्षेत असा गैरव्यवहार होऊ नये," अशी प्रतिक्रिया देत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केलीये.
दुसरा मुद्दा म्हणजे, तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पात्रता गुणांमध्ये म्हणजेच qualifying score मध्ये वाढ झालीये आणि निश्चितच स्पर्धादेखील वाढलीये. त्यामुळे भारतात बऱ्याच ठिकाणी नीट पेपर लीक झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरु केली आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही रस्त्यावर उतरले आहेत आणि नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी करताहेत. डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.