पुणे - देशपांडेच्या घरातून धनेश पिल्लाचे उड्डाण; कृत्रिम घरटे यशस्वी

11 Jun 2024 18:31:03
pune grey hornbill



मुंबई (अक्षय मांडवकर) -
पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या शैलेश देशपांडे यांच्या घरी राखी धनेशाने कृत्रिम घरट्यात केलेली वीण यशस्वी झाली आहे (pune grey hornbill). मंगळवार दि. ११ जून रोजी कृत्रिम घरट्यामधून एका पिल्लाने भरारी घेतली. अजून दोन पिल्लं घरट्यामध्ये आसऱ्यास आहेत (pune grey hornbill). शहरी भागात सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या या पक्ष्यांनी झपाट्याने बदलणाऱ्या अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न असून नैसर्गिक ढोलींच्या कमतरतेमुळे त्यांनी कृत्रिम घरटी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. (pune grey hornbill)


भारतीय राखी धनेश हा शहरी अधिवासात सर्वसामान्यपणे आढळणारा पक्षी. मात्र, आता या पक्ष्यांनी शहरी अधिवासातील नैसर्गिक संसाधनांच्या अनुपल्बधतेमुळे मानव निर्मिती संसधानांवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आहे. धनेश प्रजातीचे पक्षी हे झाडाच्या ढोलीत आपली घरटी तयार करतात. मात्र, कोथरुडमधील एमआयटी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या शैलेश देशपांडे यांच्या घरी कृत्रिम घरट्यात मार्च महिन्यात धनेशाने अंडी घातली होती. एप्रिल महिन्यापासून क्रमाक्रमाने पाच पैकी तीन अंड्यांमधून पिल्लांचा जन्म झाला. यामधील एका पिल्लाने ११ जून रोजी घरट्यामधून बाहेर येऊन आकाशात भरारी घेतल्याची माहिती देशपांडे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. घरट्यामध्ये अजून दोन पिल्ले आसऱ्यास असून त्यामधील एक बऱ्यापैकी मोठे तर दुसरे पिल्लू अजून लहान असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात मादी आणि नर धनेशाने पिल्लांना वड, उंबर, नाकतोडे भुंगा, झुरळ, तुती, चपाती, द्राक्ष, जांभूळ, अंजीर असे खाद्य खाऊ घातल्याची नोंद देशपांडे यांनी केली आहे.


देशपांडे यांच्या खिडकीसमोर असणाऱ्या वडाच्या झाडावर राखी धनेश फळे खाण्यासाठी येत असत. त्यामुळे देशपांडे यांनी २०२१ साली आपल्या सज्जामध्ये प्लायवूडच्या लाकडाचे कृत्रिम घरटे तयार करुन लावले. गेली तीन वर्ष यामध्ये साळुंकी पक्ष्याने अंडी दिली. मात्र, यंदा धनेश पक्ष्याने या कृत्रिम घरट्यामध्ये अंडी घातली होती. १० मार्च नराने कृत्रिम घरट्याची तपासणी केली होती. १६ मार्च रोजी मादीने घरट्याचे दार लिंपण्यास सुरुवात केली. २० मार्च रोजी मादीने स्वत:ला घरट्यात कोंडून घेतले. २२ मार्च रोजी मादीने घरट्यात पहिले अंडे दिले होते. त्यानंतर १८ एप्रिल रोजी पाचपैकी एका अंड्यातून पिल्लाचा जन्म झाला होता.

Powered By Sangraha 9.0