महाराष्ट्रातला पहिला ‘हर्प काऊंट’ फणसाडमध्ये; करा नोंदणी !

11 Jun 2024 14:37:22
brown vine snake
                                                                                                                                            (छायाचित्र - प्रणव बागवे)
मुंबई (विशेष प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला 'हर्प काऊंट' पार पडणार आहे. म्हणजेच अभयारण्यात अधिवास करणारे उभयचर आणि सरीसृपांची शास्त्रीय पद्धतीने नोंद केली जाणार आहे. महाराष्ट्र वनविभाग आणि ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पाला 'एसबीआय फाऊंडेशन'कडून आर्थिक सहाय्य मिळत आहे.
फणसाड वन्यजीव अभयारण्य या जैवविविधतेने समृद्ध प्रदेशामध्ये राज्यातील पहिलाच दिर्घकालीन 'हर्प काऊंट'चा प्रकल्प रावबला जाणार आहे. फणसाडमधील सरीसृप आणि उभयचर प्राण्यांच्या अभ्यासाचा हा पहिलाच दीर्घकालीन प्रकल्प असून या माध्यमातून चांगली माहिती अभ्यासक, संशोधक आणि वन विभागाच्या हाती लागणार आहे. फणसाड हे उभयचर आणि सरीसृप प्राण्यांच्या जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी आढळणारा 'ब्राऊन व्हाईन स्नेक' हा तसा दुर्मीळ साप आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी पार पडणाऱ्या पहिल्या 'हर्प काऊंट'मध्ये बेडूक, पाली, देवगांडूळ अशा दुर्लक्षित प्रजातींचाही सर्वेक्षणामध्ये समावेश असल्याने त्यांच्याविषयी जनजागृती होण्यास मदत होणार असल्याची माहिती 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'चे संस्थापक निखील भोपळे यांनी दिली. त्याचबरोबर वनविभागाकडे सुद्धा याविषयी माहिती गोळा होऊन त्याचा संरक्षण- संवर्धनासाठी उपयोग होईल, असे सांगितले. सुपेगाव परिसरात पहिले सर्वेक्षण पार पडणार असून त्याव्यतिरीक्त फणसाड अभयारण्यातील अन्य जागांवरही हे सर्वेक्षण टप्याटप्यांमध्ये पार पडणार आहे.


या 'हर्प काऊंट'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन 'ग्रीन वर्क ट्रस्ट'कडून करण्यात आले आहे. वन्यजीव आणि त्याविषयी प्राथमिक माहिती असणाऱ्या लोकांनी या क्रार्यक्रमासाठी नोंदणी करावी. यासाठी 8779409460 / 9769458564 या क्रमांकावर संपर्क करावा.


Powered By Sangraha 9.0