अभिनेत्री नूर मालाबिकाचा मृत्यू; कलाकारांच्या संघटनेने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले, “बॉलीवूडमध्ये अशा…”

11 Jun 2024 15:02:23
 
shinde
 
 
मुंबई : अभिनेत्री काजोल हिच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरीजमधील सहकलाकार नूर मालाबिका दास हिचा मृतदेह ६ जून रोजी तिच्याच मुंबईतील राहत्या घरी सापडला. ३७ वर्षीय नूरने फ्लॅटमध्येच आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. आता या घटनेनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली असून पत्र लिहित त्यांच्याकडे नूरच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
दरम्यान, मुंबई पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला असून नूरच्या मूळ गावी असलेल्या कुटुंबियांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एका एनजीओने रविवारी नूरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनेत्री नूर मालाबिका दासच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिच्या मृत्यूप्रकरणाचा तपास खूनाच्या शक्यतेतूनही केला जावा, असं त्यांनी पत्रातून म्हटले आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन तुम्हाला विनंती करत आहे की अभिनेत्री नूर मालाबिका दास हिच्या आत्महत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात यावा. सत्य समोर येईल व तिला न्याय मिळेल यासाठी तुम्ही सर्व संभाव्य दिशेने याची चौकशी करावी, अशी विनंती आम्ही करत आहोत,” असे पत्रात लिहिले आहे.
 
 
 
पुढे लिहिले आहे की, “नूरचा अकाली मृत्यू हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आत्महत्यांच्या ट्रेंडची आठवण करून देणारा आहे. बॉलीवूडमध्ये अशा दुःखद घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे यामागच्या मूळ कारणांचा सखोल तपास करणं आवश्यक आहे.” त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे आहे.
Powered By Sangraha 9.0