पंचतंत्रातील कथा आणि...

11 Jun 2024 22:06:07
Sharad Pawar on modi guarantee
नुकतेच शरद पवार म्हणाले की, “लोकशाहीतील मतदारांच्या ताकदीमुळे आता मोदी सरकारही राहिले नाही आणि ‘मोदींची गॅरेंटी’ही राहिली नाही.” शरद पवार असे म्हणाले आणि कोल्ह्याची ती गोष्ट आठवली. कोल्हा भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने द्राक्षांची बाग पाहिली. द्राक्ष पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मात्र, उंचावरची द्राक्ष त्याला काही मिळाली नाहीत आणि खाताही आली नाहीत. कोल्हा म्हणायला लागला, “छे छे, ती द्राक्ष आंबट आहेत. कोण खाणार?” थोडक्यात, ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबटच! असो. सत्तेत येण्यासाठी राहुल गांधींनी जनतेला मूर्ख बनवत गॅरेंटी कार्ड वाटले. शरद पवार यांनी वृद्ध म्हणून, तर आणि उद्धव ठाकरे यांनी दुर्बळ एकाकी पडलेला म्हणून जनतेकडून सहानुभूती लुटण्याची खेळी केली. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांची तर कथाच न्यारी. या सगळ्यांचा समान धागा होता, अल्पसंख्याकांचा पुळका. मात्र, तरीही ‘मोहब्बत की दुकान’, गरीब-मागासवर्गीय समाजासाठी खोटे वायदे करून राहुल गांधी यांनी ते कसे वेगळे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता ते विरोधी पक्षनेते होऊ शकतात म्हणे. यावरही पंचतंत्रातील ती कथा आठवते. कोल्हा नीळ घातलेल्या पाण्याच्या डबक्यात पडतो. पूर्ण निळा होतो. तो धूर्तपणे विचार करतो की, आपण श्रेष्ठ आणि कसे वेगळे आहोत. हे सांगून इतर कोल्ह्यांना आपल्यासाठी राबवू शकतो. तो जंगलात परत येऊन कोल्ह्यांना म्हणतो, “रात्री मला वनदेवता भेटली. तिने मला निळे बनवले. ती म्हणाली की,आजपासून तू जंगलाचा राजा आहेस.” मात्र, त्यांच्यातील एका ज्येष्ठ कोल्ह्याला शंका येते. तो कोल्ह्यांना कोल्हेकुई करायला सांगतो. कोल्हेकुई सुरू होते. ते ऐकून निळा झालेला कोल्हा कोल्हेकुईत सूर मिसळतो. त्यामुळे इतर कोल्ह्यांना कळते की, हा जंगलाचा राजा नाही, कोल्हाच आहे. तसेच, कोल्हेकुईने जंगलाचा राजा जागा होतो आणि तो त्या निळीने रंगलेल्या धूर्त कोल्ह्याचा फडशा पाडतो. या कथेनुसार सत्तातूर आणि त्यासाठी भोळ्या जनतेला खोटी आश्वासने देणार्‍या नेत्याने कितीही जननिष्ठेचे नाटक केले, तरी त्याच्या साथीदारांनी हिंदूद्वेष, फुटीरतावाद, भ्रष्टाचाराची दलदल माजवली की, हा नेतासुद्धा त्यात सामील होणारच. मग कथेनुसार तो धूर्त कोल्हा आणि जंगलाचा खरा राजा यांचा सामना होईलच.

पशूच आहेत!

 
सोनाक्षी सिन्हा इकबाल झहिरशी निकाह करणार, यावर ‘पेज 3’वर चर्चा रंगल्या आहेत. हे सत्य की असत्य, हा विषय नाही. सोनाक्षीच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा यांचे म्हणणे असे की, “मला याबाबत काही माहिती नाही. आताची मुले आईबाबांना विचारत नाहीत, तर फक्त सांगतात. ती आम्हाला कधी सांगते, याची आम्ही वाट पाहत आहोत.” या पार्श्वभूमीवर वाटते की, तरुण-तरुणी विवाह करतात तेव्हा त्यांच्या आईबाबांना कल्पनाही नसावी? मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल माहिती असावी, इतकाही अधिकार आईबाबांना नसावा? मुले आपल्याला विचारणार नाहीतच, हे ठामपणे, आत्मविश्वासाने पालकांना सांगावे लागते? हे प्रश्न केवळ शत्रुघ्न सिन्हांसाठीच नाहीत, तर त्यांच्यासारख्या तमाम पालकांसाठी आहेत. प्रेमविवाह आहे, त्यात काय? आईवडिलांना संसार करायचा आहे का? मुलगा-मुलगी राजी आहे ना? असे म्हणणारेही आहेतच. पण, प्रेमविवाह करताना मुलगा-मुलगी राजी असले, तरी विवाह झाल्यानंतर या मुलामुलींचे बिनसले किंवा आणि दुर्देवाने तो संसार तुटला, तर आईबाबांना एका शब्दाने न विचारता विवाहाचा निर्णय घेणारी ही मुले-मुली पुन्हा आईबाबांकडे परतून येतातच. फार कमी असे म्हणतात की, “प्रेमविवाह मर्जीने केला, विवाह करताना आईबाबांना विचारले नव्हते, त्यामुळे आता प्रेमविवाहात त्रास झाला किंवा धोका झाला तर त्यामध्ये आईबाबांना कशाला ओढायचे?” अर्थात, मुले कितीही वाईट असली आणि चुकली, तरी आईबाबांचे मन आणि त्यांच्या घराचे दार त्यांच्या पाल्यासाठी खुले असते. त्यामुळेच तर आईबाबा हे आईबाबा असतात, यात प्रश्नच नाही. मात्र, तरीही वाटते की, पालक आणि पाल्यांचा संपर्क-संवाद, नाते स्नेहपूर्ण, पारदर्शी आत्मीयतेचे असेल, तर कोणत्याही पालकाला असे म्हणावे लागणार नाही की, मुले आम्हाला विचारत नाहीत. दुसरीकडे कृतज्ञता, करूणा आणि विश्वास हे माणूसपणाचे लक्षण. पशुप्राण्यांच्या जगात आपण पाहतो की, ते मोठे झाले की त्यांच्या जन्मदात्यांना विसरतात. या पार्श्वभूमीवर पाल्यांनीही विचार करावा की, मोठे झाल्यावर आईबाबांना विसरायला ते काय पशू आहेत?


Powered By Sangraha 9.0