सरत्या हंगामात कांद्याच्या दरात उसळी

11 Jun 2024 13:05:03

कांदा
नाशिक : रुपये दर लासलगाव २७५२ , वणी २,९०० सरत्या उन्हाळी हंगामात आवक घटल्याने कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात क्विंटलला 2 हजार रुपये असलेला दर आता वाढत असून सोमवार, दि. 10 जून रोजी दुपारपर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 हजार 752, तर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या वणी येथे 2 हजार 900 रुपयांचा दर शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
 
साधारणपणे जून संपेपर्यंत कांदा चाळीत साठवलेला कांदा शेतकरी विकून मोकळा होतो. नाहीतर, कांद्याला कोंब फुटायला सुरुवात होते. कोंब फुटलेला हा कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याची विक्री करतात. यंदा दुष्काळ असल्यामुळे कांदा लागवड खूप कमी झाली होती. त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटलेली दिसून येत आहे. तसेच चाळींमध्येदेखील साठवण्यात आलेल्या कांद्याचे प्रमाण कमी होते. कांदाकाढणीच्या वेळी खूपच कमी दर कांद्याला मिळाला होता.
 
त्यामुळे खर्च भरून निघेल की नाही, हा प्रश्न कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पडला होता. मात्र, साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने खरीप हंगामाचा खर्च यावर करता येणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने खरीप हंगामातील पिकेसुद्धा जोरदार येण्याची शक्यता असल्याने बळीराजाला सुगीचे दिवस येणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0