बनावट पासपोर्टवर भारतात आलेल्या बांगलादेशींनी मुंबईत केले मतदान

11 Jun 2024 16:51:37
Mumbai ATS arrested Bangladeshi

मुंबई :
बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या बांगलादेशींनी लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदान केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू विभागाने त्यांच्या मुसक्या आवळल्या असून, अधिक तपास सुरू आहे.

मुंबईत अवैधरित्या काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. त्यात चार जणांना अटक करण्यात आली. त्यातील दोघांनी लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरी येथे मतदान केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रियाज हुसेन शेख (वय ३३, लोखंडवाला, अंधेरी) सुलतान सिद्धीक शेख (वय ५४, अंबुजवाडी, मालवणी), इब्राहिम शफिउल्ला शेख (वय ४६, म्हाडा कॉलनी, माहुल गाव), फारूख उस्मानगणी शेख (वय ३९, ओशिवरा, जोगेश्वरी) अशी आरोपींची नावे असून, ते सर्वजण मूळ नोवाखाली, बांगलादेश येथील आहेत.

त्यांच्यावर कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. सह कलम १२ (१अ) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींव्यतिरिक्त अन्य ५ जणांनी बनावट कागदपत्रे बनवल्याचे समोर आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यातील एकजण बनावट कागदरपत्रांच्या आधारे सौदी अरेबीया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.





 
Powered By Sangraha 9.0