Musk Vs Apple एलॉन मस्क टाकणार Apple च्या उत्पादनावर बहिष्कार!

11 Jun 2024 16:02:40
Elon Musk rails against Apple-OpenAI deal

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे एलॉन मस्क यांनी अॅपल कंपनीवर अनेक मोठे हल्ले केलेत. अॅपल कंपनीची खिल्ली उडवण्याबरोबरच आयफोन आणि आयमॅकवर बहिष्कार घालण्याची धमकीही एलॉन मस्क यांनी दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर अॅपल कंपनीने आपल्या उत्पादनात ओपनएआयचा वापर केला, तर ते आपल्या कंपनीत अॅपल उत्पादनावर बंदी घालतील आणि अॅपलच्या सर्व मशीन आणि फोन कंपनीच्या गेटवर ठेवतील.
 
एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहेकी, जर अॅपलने आपल्या उत्पादनात ओपनएआयचा वापर करून ऑपरेटिंग सिस्टम लेव्हल इंटिग्रेट केली, तर माझ्या कंपनीत त्यांच्या उत्पादनावर बंदी घातली जाईल. हे सुरक्षेचे उल्लंघन आम्ही अजिबात सहन करू शकत नाही. इतकंच नाही तर एलॉन मस्क यांनी अॅपलला फटकारलं आणि म्हटलं की ॲपल कंपनीही इतकी ही प्रगत नाही की ते स्वत:ची एआय प्रणाली विकसित करू शकतील. त्यामुळे अॅपलला अंदाजा नाही की, ते किती सहजपणे आपल्या वापरकर्त्यांचा डेटा ओपन एआयच्या हातात सोपवत आहेत.

मुळात एलॉन मस्क हे OpenAI च्या संस्थापकांपैकी एक आहेत, परंतु काही वर्षांपूर्वी त्यांनी एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या धोके लक्षात घेता कंपनीशी सबंध तोडले. दरम्यान, त्याच्या या ट्विटमुळे ॲपललाही बाजारात मोठा फटका बसला आहे. अॅपल कंपनीचे शेअर्स १.९१% च्या घसरणीसह बंद झाले. यासोबतच मार्केट कॅपच्या बाबतीत ॲपल मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीडियापेक्षा मागे पडली आणि तिसऱ्या स्थानावर घसरली. Nvidia चे मार्केट कॅप $२.९९५ ट्रिलियन आहे, तर Apple चे $२.९६१ ट्रिलियन आहे. त्याच वेळी, मायक्रोसॉफ्ट ही $३.१८० ट्रिलियनच्या मार्केट कॅपसह जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की Apple ने त्यांचे जनरेटिव्ह AI टूल Apple Intelligence ची घोषणा केली आहे. Apple ने आपल्या उपकरणांमध्ये AI वैशिष्ट्ये एकत्रित करण्यासाठी Open AI ची मदत घेतली आहे, ज्यामध्ये Chat-GPT समाविष्ट केले जाणार आहे. ॲपलने असेही म्हटले आहे की ते वापरकर्त्याची गोपनीयता आणि सुरक्षिततेची काळजी घेईल, परंतु एलॉन मस्क यांना हे मान्य नाही. त्यांनी याला थेट विरोध केला आहे.



Powered By Sangraha 9.0