पावसाळी अधिवेशनानंतर ‘रालोआ’च्या खासदारांची संख्या 300 पुढे!

11 Jun 2024 16:19:35

Ajit Pawar

मुंबई
: संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) खासदारांची संख्या 300 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. 10 जून रोजी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्ष मेळाव्यात भाषण करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, “येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू. तर, 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य दिसतील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे अजित पवार म्हणाले की, “काल दिल्लीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, समीर भुजबळ यांच्यासोबत बर्‍याच विषयांवर चर्चा केली. त्यानंतर मी सर्वांना ठामपणे सांगतो की, पक्षात किंवा महायुतीत कुठेही मतभेद नाहीत.
 
कारण नसताना प्रसारमाध्यमे कधीकधी वेगवेगळ्या बातम्या दाखवतात. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. प्रसारमाध्यमांशी बातचीत केली नाही, तर त्यांना असे वाटते की, आमच्याशी बोलत नाहीत. त्यांना हव्या तशा बातम्या लावत सुटतात. कालही आपल्या पक्षाबद्दल काही बातम्या पसरवल्या गेल्या. त्यानंतर आपले महायुतीतील सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती सांगितली आणि अफवांचा खंडन केले,” असेही पवार यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0