रियासी दहशतवादी हल्ला! निष्पाप भाविकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी लष्कराची शोध मोहिम

10 Jun 2024 12:42:18
 Reasi terror atatck
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवार, दि. ९ जून २०२४ संध्याकाळी शिव खोरी येथून येणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने रियासीमध्ये सोमवारी सकाळी शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात दहा यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) देखील रियासी येथे दाखल झाले असून घटनास्थळी आणि आजूबाजूच्या घनदाट जंगलात शोध मोहिमेसाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे.
 
रियासीचे जिल्हा आयुक्त विशेष महाजन यांनी रविवारी रात्री दहशतवादी हल्ल्यात किमान १० भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. अन्य ३३ जण जखमी झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव खोरी मंदिरापासून कटराकडे जाणाऱ्या बसला संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या च्या सुमारास राजौरी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या रियासी जिल्ह्यातील पौनी भागात पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी बसला लक्ष्य केले.
 
"दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली," असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) रियासी, मोहिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. एसएसपी पुढे म्हणाले की बचाव कार्य पूर्ण झाले असून जखमींना नरैना आणि रियासी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. “प्रवाशांची ओळख पटलेली नाही. प्राथमिक अहवालात ते उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि त्यामागे असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0