अयोध्येतील 'महाराष्ट्र सदन' दोन वर्षांत पूर्ण होणार!

10 Jun 2024 18:57:35
 
Ravindra Chavan
 
लखनौ : अयोध्येतील महाराष्ट्र सदनाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला असून, राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी येत्या दोन वर्षांत ही वास्तू बांधून पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सदनासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी ६७.१४ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण व अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे २६० कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  "महायुतीतील नेत्यांनी जाहीर वक्तव्य टाळवीत!"
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच या प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत्रे, मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेचा अभियंता पी.के.सिंग, अभिषेक वर्मा, विनय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. या २.३२७ एकर जागेच्या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून उत्तर प्रदेश सरकारला १० टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत जागेचा पूर्ण मोबदला देऊन लवकरात लवकर ही वास्तू बांधण्याची कार्यवाही सुरू होईल, असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
 
राम मंदिरापासून किती अंतर?
 
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे ७.५ कि.मी., तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनपासून ४.५ कि.मी. अंतरावर हे प्रस्तावित महाराष्ट सदन उभारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0