रविवारच्या सुट्टीला मान्सून मुंबईत

10 Jun 2024 12:15:55
image 23
 
मुंबई :-यंदा राज्यासह देशाला कडक उन्हाच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून सगळ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या होत्या. अखेर रविवार, दि. 9 जून रोजी पाऊस मुंबईत दाखल झाला. ‘मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागा’कडून मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली असून सर्वसाधारण तारखांच्या तुलनेत मान्सून मुंबईत दोन दिवस अगोदर दाखल झाला आहे.
 
सर्वसाधारणरित्या मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारिख 11 जून आहे. यावर्षी मान्सून दोन दिवस अगोदर म्हणजे दि. 9 जून रोजी मुंबई दाखल झाला आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर शुक्रवार, दि. 14 तारखेपर्यंत मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर किंचित का होईना, कायम राहील असा, अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
 
मुंबईसाठी यलो अलर्ट मान्सूनचे आगमन दोन दिवसांपूर्वी कोकणात झाले आहे. त्यानंतर राज्यातील इतर भागांत मान्सून दाखल होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातदेखील पुढील तीन दिवसांत जोरदार पाऊस असणार आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांनी कामाला सुरुवात करायला हरकत नाही, पण पेरणीसाठी घाई करू नका, असे हवामान विभागाने म्हटले आहे. अंदाज खरा ठरला गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि शहर उपनगरातील उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
 
दक्षिण कोकणात दाखल झालेला मान्सून दि. 10 जूनच्या आसपास मुंबई दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. शनिवारीदेखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार तीन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होणार होता. हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने चार दिवस अधिक आणि वजा असे गृहीत धरले होते. त्यानुसार, मान्सूनने रविवारी मुंबईत आगमन केले आहे.
 
सिंधुदुर्गमध्ये विक्रमी पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात यावर्षीची विक्रमी 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस 187 मिलीमीटर कुडाळ तालुक्यात झाला. तर, देवगडमध्ये 158 मिलीमीटर मालवणमध्ये 152 मिलीमीटर, सावंतवाडीमध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर कोसळणार्‍या पावसाने पहाटेपासून विश्रांती घेतली असली, तरी पुढच्या 24 तासांत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  
 
 
Powered By Sangraha 9.0