मेट्रो 2अ, 7 मार्गिकेवर प्रवासी संख्येचा एक दिवसात उच्चांक

10 Jun 2024 14:50:59

Metro
 
मुंबई : मुंबईतील मेट्रो मार्गिका 2अ आणि 7 वर एकाच दिवसात 2 लाख, 60 हजार, 471 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत एका दिवसातील प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला आहे, अशी माहिती ‘महामुंबई मेट्रो संचलन महामंडळा’कडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडून (एमएमआरडीए) मेट्रो 2अ आणि 7 मार्गिकेतील दहिसर ते डहाणुकरवाडी-आरे असा 20 किमीचा पहिला टप्पा एप्रिल 2022 मध्ये सेवेत दाखल करण्यात आला आहे.
 
तर जानेवारी 2023 मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल झाला आणि दहिसर ते अंधेरी (प) अशी मेट्रो 2अ आणि दहिसर ते गुंदवली, अशी मेट्रो 7 मार्गिका कार्यान्वित झाली. दरम्यान, मेट्रो 2अ आणि 7चा पहिला टप्पा सेवेत दाखल झाला. पहिल्याच दिवशी या मार्गिकेवरून 55 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. तर पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर पहिल्या पाच महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर 2022 मध्ये एकूण प्रवासी संख्या 50 लाखांच्या घरात गेली होती.
 
कालांतराने या पहिल्या टप्प्याला प्रतिसाद वाढत गेला आणि जेव्हा पूर्ण क्षमतेने अर्थात दहिसर ते अंधेरी(प) (मेट्रो 2अ) आणि दहिसर ते गुंदवली (मेट्रो 7) या दोन्ही मार्गिका धावू लागल्या. त्यावेळी प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाल्याची माहिती एमएमएमओसीएल देण्यात आली आहे.
दोन वर्षांत प्रवासी संख्या दहा कोटींवर
एमएमएमओसीएलवर या दोन्ही मार्गिकेच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी आहे. एप्रिल 2022 ते 2024 यांदरम्यान दहा कोटी प्रवाशांनी मेट्रो 2अ आणि 7 वरून प्रवास केला आहे. यावर एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने समाधान व्यक्त केले आहे. दिवसाला 2 लाख, 30 हजार ते 2 लाख, 40 हजार प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करताना दिसत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0