छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराची महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरूवात

10 Jun 2024 18:25:04

मंगल लोढा
 
मुंबई : १० जून, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १० जूनपासून पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहेत. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सदर मार्गदर्शन शिबिराचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा उद्घाटन समारोह शासकीय प्रशिक्षण संस्था औंध यांच्यामार्फत पंडित भीमसेन जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.
 
१० जूनपासून महाराष्ट्रातील ३५० ठिकाणी हा कार्यक्रम रावबवण्यात येणार असून, या माध्यमातून युवकांना योग्य करियर आणि शिक्षणाच्या संधी निवडण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअर विषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाणार आहे.
 
दहावी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण आणि अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कालमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी विषयांवरील मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी स्थानिक आयटीआयसोबत संपर्क साधू शकतात.
 
या प्रसंगी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जास्तीत जास्त प्रमाणात या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमासाठी ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. करियर निवडताना सुद्धा कौशल्य प्रशिक्षण तितकेच महत्वाचे आहे, या उद्देशाने मार्गदर्शनाबरोबरच कौशल्य विकास विभागाद्वारे १००० महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विदेशात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक महसूल विभागात एक कौशल्य विकास प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0