सुधीर फडके अर्थात बाबूजी यांना ‘वीर सावरकर’ हा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करायचा होता आणि या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेसाठी सुनील बर्वे यांची निवड झाली होती.
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुधीर फडके यांच्याशी झालेली वैयक्तिक भेट कधी आणि कशासाठी होती याचा खुलासा करत आठवणींना उजाळा दिला.
योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्रपटात सुनील बर्वे यांनी बाबूजींची भूमिका साकारली आहे. त्यांच्याबद्दल आठवण सांगताना सुनील बर्वे म्हणाले की, “बाबूजींशी वैयक्तिक भेटणं वीर सावरकर या चित्रपटाच्या वेळी झालं होतं. त्यावेळी सेनापती बापट यांच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती. पण कालांतराने चित्रपटाचे दिग्दर्शक बदलल्यामुळे ती भूमिका माझ्याकडून झाली नाही पण बाबूजींशी झालेली भेट आयुष्यभर लक्षात राहिली. आणि दुसरी एक आठवण म्हणजे त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त स्वरतीर्थ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मी केले होते आणि आजही माझ्याकडे त्या कार्यक्रमाचे स्वरुप लिखित रुपात आहे आणि त्या पुस्तकावर सुधीर फडके, ललिताबाई फडके, बाबासाहेब पुरंदरे, मीनाताई ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत”.
सुनील बर्वे सध्या संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष असून त्यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कसा संबंध आला याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी शाखेत जाणारा स्वयंसेवक कधीच नव्हतो. पण आई-वडिलांकडून मला जी संघाची शिस्त आणि विचारधारा मिळाली त्यामुळे मी संघाशी जोडले गेलो. ज्यावेळी मी संस्कार भारतीचा उपाध्यक्ष झालो त्यावेळी संघाचा विचारांशी माझी अधिक ओळख झाली आणि त्याचवेळी संघाच्या कामाची व्याप्ती किती आहे याबद्दलही मला तेव्हाच समजलं. पण इचकं मोठं कार्य फार उशीराने कळलं याचं दु:ख मला नक्कीच झालं. ज्या निर्व्याज, निरपेक्ष भावनेनं संघाचं काम सुरु आहे ते विलक्षण आहे. आणि उगाच कोणत्याही प्रसिद्धी शिवायही ते ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे ते पोहोचत आहे”, अशी संघाबद्दलच्या भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.