एका वळणावर आपण...

01 Jun 2024 20:50:19
pm modi meditates kanyakumari


प्रत्येकाचा एक चाहता वर्ग आहे. सत्ता ही भोगाची जननी असते आणि सर्वांना या ना त्या प्रकारे सत्ताभोग पाहिजे आहे. आश्चर्यकारकरित्या नरेंद्र मोदी या सत्ताभोगापासून अलिप्त असणारे राजनेते ठरतात. म्हणून ते सर्वांच्या डोळ्यांत काट्यासारखे सलत असतात. या ‘अवसर्पिणी’ कालखंडातील असुरी शक्ती एका मर्यादेपर्यंत वाढत जाणारी आहे. त्या यशस्वी होतील का?

लोकसभेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. पूर्वी एक म्हण होती, ‘प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते.’ या म्हणीत आता आणखी एका विषयाची भर घालायला पाहिजे- ‘प्रेमात, युद्धात आणि निवडणूक प्रचारात सर्व काही क्षम्य असते.’ परंतु, क्षम्यतेला काही मर्यादा असाव्या लागतात. प्रेमामध्ये, प्रेमात अडथळा निर्माण करणार्‍याचा खून करणे क्षम्य नसते. युद्धात स्त्रिया, मुले, वृद्ध, रुग्ण यांना ठार मारणे क्षम्य नसते. तसेच, निवडणूक प्रचारात भन्नाट खोटे बोलणे, बेताल बोलणे, नैतिक पातळी सोडून बोलणे, महापुरुषाचा अपमान करणे क्षम्य नसते.

देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा, मी सात ते आठ वर्षांचा होतो आणि आता १७व्या लोकसभेची निवडणूक होत असताना मी, वयवर्षे ७५ पार करून गेलो आहे. यावेळचा निवडणूक प्रचार खास करून महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडणारा झाला, असे मला प्रकर्षाने वाटले. निवडणूक प्रचारात भाषणे करणार्‍या कोणत्याही नेत्याला मी आवरू शकत नाही आणि सुधारूही शकत नाही. ही माझी मर्यादा आहे.

योगायोगाने याच काळात भगवान महावीर यांच्या जीवनकार्याचा मी अभ्यास केला. भगवान महावीर आणि जैन संप्रदाय यांच्याविषयीची अनेक पुस्तके वाचली आणि जे मला समजले त्याचे ‘आपले भगवान महावीर’ या शीर्षकाचे पुस्तकही लिहून काढले. ते यथावकाश ‘विवेक’तर्फे प्रकाशित होईल.

जैन धर्म तत्त्वज्ञानात कालचक्राची एक संकल्पना मांडली आहे. या कालचक्राचे दोन भाग केले गेले आहेत. पहिल्या भागाला ‘उत्सर्पिणी’ आणि दुसर्‍या भागाला ‘अवसर्पिणी’ असे म्हटले गेले आहे. प्रत्येक विभागाचे तीन-तीन भाग केलेले आहेत. ‘उत्सर्पिणी’ कालखंड म्हणजे उत्थानाचा कालखंड. ‘अवसर्पिणी’ कालखंड म्हणजे पतनाचा कालखंड. या पतनाच्या कालखंडाच्या सहाव्या भागातून आपण चाललो आहोत, असे जैन मत सांगते. हा अत्यंतिक दुःखाचा काळ आहे.

या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे, निवडणूक प्रचाराच्या काळात जी रणधुमाळी झाली, ती यात बघायला मिळेल. असंख्य शिवीगाळ, दुसर्‍याचा हेवा, मत्सर, असुया, स्वतःची प्रशंसा, ईर्षा, द्वेष ही सर्व अवसर्पिणी कालखंडाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचे जाहीर प्रदर्शन रोजच आपण सर्व बातमीपत्रांतून, वर्तमानपत्रांतून वाचत आलो आहोत आणि अशा वेळी मनामध्ये विचारांची चक्रीवादळे सुरू होतात.

वर्धमान महावीर यांचे जीवनकार्य समजून घेण्यापूर्वी मी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनचरित्राचा मला जमेल तसा अभ्यास केलेला आहे. त्यावर पुस्तकेदेखील लिहिलेली आहेत. उपनिषदे, रामायण-महाभारत, पतंजली योगसूत्र इत्यादींचे जमेल तसे वाचन केलेले आहे. त्यातून एका गोष्टीची अनुभूती आली, ती म्हणजे, आपला देश भारत ही धर्मभूमी आहे. धर्म भारताचे प्राणतत्त्व आहे. धर्माच्या सत्याची अनुभूती घ्यावी लागते. अनुभूतीसाठी साधना करावी लागते. कठोर तपश्चर्या करावी लागते. भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी या प्रकारे तपश्चर्या केली आहे, ती अतिशय धक्क करणारी आहे. यातून दोघांनाही विश्वरचनेच्या गूढ तत्त्वांचे आकलन झाले. ते सर्वज्ञ आणि त्रिकाल ज्ञानी झाले.

हे ज्ञान त्यांनी लोकभाषेत सामान्य माणसाला समजेल अशी उदाहरणे आणि कथा सांगून दिले. हे सर्व अफाट आहे. लक्षपूर्वक वाचणार्‍याला हे ज्ञान एका उंचीवर घेऊन जाते. स्वत़ःचे आणि समाजाचे जीवन सुखी करण्याचा मार्ग दाखवते. याउलट राजकारणात चाललेले असते. भारतातील धर्ममार्ग सांगतात की, काया, वाचा, मन यांनी कोणाची हिंसा करू नका. असत्याचा आश्रय कधीही घेऊ नका, जे केले असता, मला सुख वाटते, ते केले असता इतरांनादेखील सुखच वाटेल. म्हणून सुखाची वाटणी करा. केवळ भोगमय जीवन जगू नका. भोग आणि त्याग याचे संतुलन साधा. भगवान महावीरांनीदेखील हेच सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी यापेक्षा काही वेगळे सांगितले नाही. धर्म जगणार्‍या सर्व संतांनीदेखील हेच सांगितले आणि आताच्या काळातील स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यापेक्षा वेगळे काहीही सांगत नाहीत.

राजकारण याच्या विरुद्ध चालते. नेहमी सत्य बोलायचे नाही. बोलताना असे बोलायचे की, ज्याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. आपल्यापेक्षा दुसर्‍या कोणाला मोठे होऊ द्यायचे नाही. तो मोठा होऊ लागला, तर त्याचे पंख कापायचे. प्रथम त्याला मंत्रिमंडळाची शपथ घ्यायला लावायची आणि नंतर त्याला उघडे पाडायचे. युती करायची आणि स्वार्थासाठी नंतर ती मोडायची. अफाट धनसंग्रह करायचा. सर्व शहरांत आपली मालमत्ता निर्माण करायची. बिल्डर, दारू उत्पादक आणि भाई लोक यांना प्रसन्न ठेवायचे. समाजजीवनातील या दोन धारा आहेत, त्या एकाच वेळी धावताना दिसतात.

दुसर्‍या धारेचा प्रमाणाबाहेर प्रभाव वाढला की, ‘अवसर्पिणी’ कालखंड सुरू होतो. देशभर सर्व पंथांचे धर्माचार्य आहेत, बौद्धाचार्य आहेत, जैनाचार्य आहेत, वेदाचार्य आहेत, योगाचार्य आहेत. त्यांच्या दर्शन आणि प्रवचनाला गर्दीदेखील असते. त्यांचे कार्य ‘उत्सर्पिणी’ काळाचे बीजारोपण करणारे कार्य आहे. सत्प्रवृत्ती आणि सत्यधर्म जीवंत ठेवण्याचे त्यांचे कार्य चालू असते. ते जबरदस्त प्रभावी झाले आहे, असे म्हणता येणार नाही. आज सर्व देशभर राजकारणी नेत्यांचा प्रभाव आहे. प्रत्येकाचा एक चाहता वर्ग आहे. सत्ता ही भोगाची जननी असते आणि सर्वांना या ना त्या प्रकारे सत्ताभोग पाहिजे आहे. आश्चर्यकारकरित्या नरेंद्र मोदी या सत्ताभोगापासून अलिप्त असणारे राजनेते ठरतात. म्हणून ते सर्वांच्या डोळ्यांत काट्यासारखे सलत असतात. या ‘अवसर्पिणी’ कालखंडातील असुरी शक्ती एका मर्यादेपर्यंत वाढत जाणारी आहे. त्या यशस्वी होतील का?

आपल्या देशाच्या इतिहासाने त्याचे उत्तर देऊन ठेवले आहे. हे उत्तर असे की, आज जरी अहिंसा सत्य अपरिग्रह, अव्यभिचार, चारित्र हा धर्म क्षीण वाटला, तरी तो संपलेला नाही. तो बीजरुपाने सर्वत्र अस्तित्त्वात आहे. त्याला नष्ट करणे अशक्य आहे. भगवान महावीरांच्या जीवनात असुरी शक्ती आल्या होत्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातदेखील असुरी शक्ती आल्या होत्या. पण, या पराभूत झाल्या.

भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर दोघेही राजपुत्र होते आणि त्यांचा जन्म गणतंत्रराज्य पद्धतीत झालेला आहे. प्रजासत्ताक राजसत्तेतून त्यांची निर्मिती झालेली आहे. प्रजातंत्राची मूलभूत तत्त्वे ते जगताना दिसतात. सर्वांभूती समत्वभाव याला ‘समता’ म्हणतात. आत्म्याला बांधून ठेवणार्‍या बंधनातून मुक्ती याला ‘स्वातंत्र्य’ म्हणतात. मी सर्वात आणि सर्व माझ्यात याला ‘बंधुभाव’ म्हणतात. सर्वांविषयी समत्वाची भावना याला ‘न्यायतत्त्व’ असे म्हणतात. भगवान महावीर हे सर्व जगले. म्हणून त्यांच्या शिकवणुकीचे सार ‘जगा आणि जगू घ्या’, या चार शब्दांत मांडले जाते. राजकारण्यांच्या मागे किती धावायचे, याचा विचार ज्याचा त्याने करावा.

भोगाच्या मागे धावायचे की, त्याग आणि भोग याचे संतुलन शिकविणारा धर्म स्वीकारायचा, या वळणावर आपण उभे आहोत.

९८६९२०६१०१
Powered By Sangraha 9.0