मोठी बातमी! उबाठा गटाच्या नेत्याला तडीपारीची नोटीस

09 May 2024 11:39:17
 
Uddhav Thackeray
 
नाशिक : उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी सुरु असल्याने नाशिक पोलिसांकडून त्यांना ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी ही नोटीस स्विकारण्यास नकार दिला असून ते आता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ऐन निवडणूकीच्या काळात बडगुजर यांना तडीपारीची नोटीस मिळाल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
 
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी त्याच्यासोबत डान्स पार्टी केल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता. या पार्टीचे फोटोही त्यांनी सभागृहात सादर केले होते. तेव्हापासूनच हा विषय चर्चेत होता. दरम्यान, आता सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.
 
कोण आहे सलीम कुत्ता?
 
१२ जुलै १९९२ रोजी दाऊद इब्राहिमच्या टोळीने अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदकरची हत्या केली होती. त्यांनी मुंबईतील जेजे रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये घुसून गोळीबार केला होता. दाऊदचा भाऊ इस्माईलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या टोळीने जेजे हॉस्पिटलवर हल्ला केला होता. अंडरवर्ल्डने एके-४७ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. या हत्याकांडाचा सलीम कुत्ता मूख्य सुत्रधार होता. सलीम कुत्ता दाऊद इब्राहिम टोळीचा मुख्य शूटर होता. अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. सलीम कुत्ता दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकील सोबत गुन्हेगारी कारवाया करायचा.
 
 
 
Powered By Sangraha 9.0