भारतीय निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा अमेरिकेचा प्रयत्न- रशियाचा दावा

09 May 2024 19:26:28
मारिया जखारोवा

नवी दिल्ली : भारताच्या लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असा खळबळजनक दावा रशियाने केला आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत अमेरिकेवर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाबाबत अमेरिकेचे भारतावर होणारे नियमित निराधार आरोप म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय मानसिकतेचा गैरसमज आहे.

याद्वारे हे भारताचा अनादर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेने भारतावर धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा एकमेव उद्देश सार्वत्रिक निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा होता. अशा प्रकारचे अहवाल प्रकाशित करून भारतातील अंतर्गत परिस्थिती अस्थिर करण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे रशियाने म्हटले आहे.
 
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू यांच्या हत्येवरूनही रशियाने अमेरिकेस फटकारले आहे. पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा अमेरिकेचा दावा रशियाने फेटाळून लावला आहे. गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटात यांचा भारताचा सहभाग होता हे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने अद्याप कोणतीही विश्वसनीय माहिती किंवा पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे हा प्रकार म्हणजे भारतास जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा असल्याचीही टिका रशियाने केली आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0