“...म्हणून आमच्या घरात अरे-तुरे बोलत नाहीत”, रितेशने सांगितलं कारण

08 May 2024 11:26:22
अभिनेता रितेश देशमुख लवकरच राजा शिवाजी चित्रपट भेटीला घेऊन येणार असून या चित्रपटाचे तो दिग्दर्शन देखील करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकत तो दिसणार आहे. शिवाय आगामी हाऊसफुल्ल ५ मध्ये देखील तो झळकणार आहे.
 

deshmukh 
 
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा समतोल राखणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) . वडिल जरी राजकारणात कार्यरत होते असले तरी त्याने आपला मार्ग निवडला आणि स्वबळावर मनोरंजनसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. ज्यावेळी रितेश देशमुखने अभिनेता व्हायचे असे वडिलांना सांगितले होते, तेव्हा विलासराव देशमुख यांनी त्यांना केवळ एकच सल्ला दिला होता तो असा की “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे”. दरम्यान, जितका पाठिंबा त्याच्या वडिलांनी दिला तितकाच पाठिंबा त्यांची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिनेही रितेशला (Ritesh Deshmukh) दिला. नुकत्याच देवयानी पवारच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रितेशने महत्वपुर्ण गोष्टींवर भाष्य केले आहे.
 
वडिलांबद्दल सांगताना रितेश म्हणाला, “मला असं वाटतं आपले संस्कारच आपल्याला घडवतात. त्यामुळे विशिष्ट वयात आपल्यावर कसे संस्कार होतात हे खूप महत्त्वाचं असतं. मी माझ्या वडिलांकडून आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकलो. आमचं संपूर्ण बालपण बाभळगावात म्हणजेच लातूरमध्ये गेलं. त्यामुळे आजही सुट्ट्या पडल्या की, मुलांना घेऊन आम्ही लातूरला गावी जातो. त्याठिकाणी आम्ही अनेक सण एकत्र साजरे करतो.”
 
पुढे तो म्हणाला की, “आपल्या गावाशी आपली नाळ कायम जोडली गेलेली असते. आयुष्यात तुम्हाला ‘आदर’ मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये ही सर्वात मोठी शिकवण त्यांनी मला दिली. तुम्हाला वाटतं एखाद्याने तुमचा आदर करावा, तर सर्वप्रथम तुम्ही संबंधित व्यक्तीचा आदर करायला शिकलं पाहिजे.”
 
रितेश त्याच्या बायकोला कधीच अरे-तुरे करताना दिसत नाही. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “आमच्या घरी कोणीच एकमेकांना अरे-तुरे बोलत नाहीत. माझे आजोबा मला तुम्ही बोलायचे. मी माझ्या दोन्ही भावांना आदराने आम्ही-तुम्ही म्हणतो. माझी दोन्ही मुलं मला आदराने आवाज देतात. ही शिकवण माझ्या वडिलांकडून मला मिळाली. बऱ्यादा लोक सांगतात ‘अरे मला तू म्हण…तुम्ही बोलू नकोस’ पण, ते मला आता जमत नाही. कारण, जी शिकवण आपल्याला मिळते तिच कायमस्वरुपी राहते. अगदी काही जवळचे मित्र असतील तरच मी ‘तू’ वगैरे म्हणतो.” असे रितेश देशमुखने सांगितले.
Powered By Sangraha 9.0