एलॉन मस्कचा भारताला वळसा घालून चीन दौरा कशाला?

07 May 2024 20:03:45
 Elon Musk

‘टेस्ला’ला स्वयंचलित गाड्यांच्या क्षेत्रात अटी आणि शर्तींसह परवानगी देऊन, चीनने अमेरिकेला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. यात भारताचा थेट काहीही संबंध नाही. व्यापार आणि परदेशातील गुंतवणुकीचे निर्णय केवळ व्यवहारापोटी घेतले जातात. त्यांना देशाशी किंवा राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे.

एलॉन मस्क भारतात येणार आणि अब्जावधी डॉलर गुंतवणुकीचा करार करणार म्हणून काही दिवसांपूर्वी अनेकांची उत्सुकता ताणली गेली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमधील एक म्हणून स्थान मिळवलेले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात धाडसी गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जाणारे मस्क आपली ‘टेस्ला’ ही अमेरिकेत सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक गाडी भारतात बनवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी भारतात यावे म्हणून मोदी सरकारनेही अनेक महिन्यांच्या वाटाघाटींनंतर आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल केले. मस्क यांचा भारत दौरा गुंतवणुकीसाठी नसून, नरेंद्र मोदींच्या प्रचार तंत्राचा भाग आहे, अशा प्रकारची कोल्हेकुई विरोधी पक्ष आणि त्यांना धार्जिण्या माध्यमांकडूनही सुरु झाली होती. पण, अचानक मस्क यांचा भारत दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला आणि ते चीनला गेले. चीनचे पंतप्रधान लि चिआंग यांच्याशी तसेच वरिष्ठ सरकारी प्रतिनिधींना एलॉन मस्क भेटले.

एवढेच नाही तर ‘टेस्ला’ने चीनच्या सरकारी सर्च इंजिन कंपनी ‘बायडू’शी करार केल्यामुळे कंपनीच्या स्वयंचलित गाड्या चीनमध्ये उपलब्ध करण्याचा पर्याय खुला झाला. त्यामुळे मग मस्क यांच्या न झालेल्या भारत दौर्‍याची चर्चा रंगली. जे पत्रकार मस्क यांच्या भारत दौर्‍यावर टीका करत होते, तेच आता या निवडणुकीत मोदींचा पराभव होत असल्याची जाणीव झाल्याने मस्क यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला वगैरे म्हणत त्यांचे कौतुक करु लागले. ‘टेस्ला’ने उडवलेला धुरळा खाली बसत असताना, या विषयाची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.२००३ साली स्थापन झालेल्या कंपनीचे नाव १९व्या शतकातील विख्यात संशोधक निकोला टेस्लाच्या नावावरुन घेतले आहे. बॅटरीवर आधारित वाहनांची निर्मिती, मोबाईल फोनसारखे त्यातील सॉफ्टवेअर सातत्याने अद्ययावत करता येण्याची सोय असणे आणि भविष्यात स्वयंचलित गाड्यांची निर्मिती करणे, अशी उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवून अमेरिकेतील बाजारपेठेत दबदबा निर्माण करणार्‍या आणि पेट्रोलजन्य इंधनावर चालणार्‍या जर्मन आणि जपानी वाहननिर्मिती कंपन्यांना आव्हान देणे, ही अशक्यप्राय गोष्ट होती.

२००८ साली ‘टेस्ला’ने एलॉन मस्क यांना आपले मुख्य कार्यकारी अधिकारी नेमल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. पुढील दशकभरात ‘टेस्ला’ने बाजारात आणलेल्या गाड्या अमेरिकेत कमालीच्या लोकप्रिय ठरल्या आणि आज ‘टेस्ला’ ही अमेरिकेत सर्वाधिक विकली जाणारी गाडी बनली आहे. २०१९ मध्ये वर्षभराच्या आत ‘टेस्ला’ने शांघायमध्ये आपले उत्पादन केंद्र सुरु केले. तिथे दरवर्षी सुमारे साडेसात लाख गाड्या बनत आहेत. एलॉन मस्क ‘ट्विटर’ किंवा ‘एक्स’ तसेच ‘स्टार लिंक’, ‘न्यूरालिंक’ आणि ‘स्पेसएक्स’सारख्या भविष्यवेधी कंपन्यांचे मालक असले, तरी ‘टेस्ला’ने त्यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनवले. चीनमधील यशस्वी सुरुवातीनंतर मस्क भारतात येण्यासाठी प्रयत्नशील असले, तरी मोदी सरकारने राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन त्यांना अपेक्षित असलेल्या सवलती आणि चीनमधून मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची परवानगी द्यायला नकार दिला.

 
‘कोविड-१९’च्या संकटानंतर चीन आणि अमेरिकेतील व्यापार तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील युद्ध आणखी तीव्र झाले. एकीकडे चीनचा आडमुठेपणा, विस्तारवाद आणि अमेरिकेला आव्हान द्यायचा प्रयत्न, यामुळे अमेरिकेसाठी चीन सर्वांत मोठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे अमेरिकेतील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडून आपल्या उत्पादनांच्या पर्यायी पुरवठा साखळ्या उभारण्यास प्राधान्य दिले. ‘टेस्ला’समोर चीनचे दुहेरी आव्हान आहे. आजही ‘टेस्ला’च्या गाड्यांचा पल्ला, त्यांचे सॉफ्टवेअर आणि स्वयंचलित होण्यास मदत करणारी यंत्रणा जगात सर्वोत्तम असली तरी आघाडीच्या चिनी कंपन्यांनी ‘टेस्ला’ला केव्हाच मागे टाकले आहे. ‘बीव्हायडी’ या चिनी कंपनीने गेल्या वर्षी ३० लाखांहून अधिक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्या विकल्या. ‘टेस्ला’ला चिनी बाजारपेठेत मागे टाकल्यावर त्यांनी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सुरुवात केली आहे.

‘टेस्ला’च्या गाड्या विकसित देशांतील सर्वसामान्य लोकांना परवडू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यातील स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी त्यांना कमी किमतीची वाहने बाजारात आणणे आवश्यक आहे. चीनची लोकसंख्या युरोप आणि अमेरिकेच्या एकत्रित लोकसंख्येच्या दुप्पट असून, चीन हा विकसनशील देश असल्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत गाड्यांची मागणीही जास्त आहे. सगळ्यात मोठे आव्हान ‘टेस्ला’च्या स्वयंचलित गाड्यांसाठी आहे. अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील युद्ध तीव्र झाले आहे. चीनने अमेरिकेच्या समाजमाध्यम कंपन्यांना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे गुगल, फेसबुक, ट्विटर आणि अ‍ॅमेझॉनच्या अनेक सेवा चीनमध्ये उपलब्ध नाहीत. स्वयंचलित गाड्या उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणेच्या साहाय्याने काम करतात. ‘टेस्ला’ गाडीचे सॉफ्टवेअर अमेरिकन कंपन्यांच्या सेवा वापरत असल्यामुळे या क्षेत्रात चीन ‘टेस्ला’ला परवानगी देत नव्हता. चीनला भीती वाटते की, ‘टेस्ला’च्या माध्यमातून अमेरिका आपल्याकडील संवेदनशील जागांचे चित्रण करेल आणि आपली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणेल. नेमकी अशीच भीती भारतासह पाश्चिमात्य देशांनाही चीनबद्दल वाटते.
 
आज इलेक्ट्रिक गाड्यांतील बॅटरी, कॅमेरे, चिप्स आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या निर्मितीवर चीनचे वर्चस्व आहे. या गोष्टींच्या भारतातील निर्मितीची कोणतीही ठोस योजना नसताना ‘टेस्ला’सारख्या कंपन्यांना भारतात मुक्त प्रवेश दिला, तर भारतातील वाहन उद्योग उद्ध्वस्त होईल. दुसरीकडे भारतात इलेक्ट्रिक वाहन उद्योग उभारायचा असेल, तर ‘टेस्ला’सारख्या अमेरिकन, जपानी आणि युरोपीय कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून भारतीय कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांचे तंत्र शिकणे आवश्यक आहे. पण, दुसरीकडे ‘टेस्ला’साठी भारतात येण्याहून चीनमध्ये गुंतवणूक वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वयंचलित गाड्यांचे तंत्रज्ञान अजून संपूर्णतः विकसित झाले नसून, ते विकसित होण्यासाठी अधिकाधिक गाड्यांमध्ये त्याचा वापर होणे आवश्यक आहे. अमेरिका आणि युरोपपेक्षा चीनमधील वाहनांच्या विक्रीची संख्या अधिक असल्याने ती संधी केवळ चीन पुरवू शकतो. चिनी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ‘टेस्ला’ला आपल्या गाड्यांच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी कराव्या लागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘टेस्ला’च्या नफ्यात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. ती सावरणे हे मस्क यांच्यासाठी भारतात नवीन उत्पादन केंद्र सुरु करण्यापेक्षा महत्त्वाचे आहे.

चीनची अर्थव्यवस्था संकटात आहे. अमेरिका आणि युरोपीय देश चीनची नाकाबंदी करु लागले आहेत. नुकताच अमेरिकेच्या संसदेने चिनी कंपनी ‘टिकटॉक’ला त्यांच्या अमेरिकेतील कंपनीची मालकी अमेरिकन कंपनीला विका किंवा मग अमेरिकेतून गाशा गुंडाळा, असा आदेश दिला आहे. चीनला आपली घसरती अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी विकसित देशांतील बाजारपेठांची गरज आहे. चीनच्या या रणनीतीतून एलॉन मस्कच्या चीन भेटीची योजना आखली गेली असावी. ‘टेस्ला’ने चिनी कंपनी ‘बायडू’शी त्यांनी पुरवलेले नकाशे आणि दळणवळण सेवा वापरण्याबाबत करार केला. त्यामुळे त्यांच्या स्वयंचलित गाड्यांना चीनमध्ये विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘टेस्ला’ला स्वयंचलित गाड्यांच्या क्षेत्रात अटी आणि शर्तींसह परवानगी देऊन, चीनने अमेरिकेला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. यात भारताचा थेट काहीही संबंध नाही. व्यापार आणि परदेशातील गुंतवणुकीचे निर्णय केवळ व्यवहारापोटी घेतले जातात. त्यांना देशाशी किंवा राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. एलॉन मस्क यांच्या न झालेल्या भारतभेटीने राजकारण ढवळून निघाले. म्हणूनच विकासाच्या मुद्द्यांवर होणार्‍या चर्चेचा स्तर वाढण्याची मोठी गरज आहे.




 
Powered By Sangraha 9.0