अभिनेते अजिंक्य देव लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटात महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकाचा काळ गाजवणारे अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना बहाल केले. मराठीतील या जोडीने अनेक सदाहाबर गाणी देखील देऊ केली. याशिवाय त्यांनी अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांच्या रुपात एक उत्तम नट देखील मनोरंजनसृष्टीला दिला. नुकतीच अजिंक्य देव यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्ट मध्ये हजेरी (Ajinkya Deo) लावली होती. यावेळी त्यांनी नकळत चित्रपटसृष्टीत आल्याची कबुली दिली.
अजिंक्य देव म्हणाले की, “मला मुळात चित्रपटसृष्टीत येण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला पायलट व्हायचं होतं. पण माझ्या वडिलांना रमेश देव यांना मला हिरो बनवायचेच होते. बरं माझी इच्छा नसूनही माझ्यातही अभिनयाचा किडा होता. कारण, जेव्हा शोले चित्रपट प्रदर्शित झालो होता, तेव्हा त्या चित्रपटाच्या संवादाची एक टेप बाजारात आली होती. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे ती टेप लावून सर्व डायलॉग बोलत ते अॅक्ट करायचो. माझा भाऊ त्यातली प्रत्येक भूमिका करायचा; पण मी फक्त अमिताभ बच्चन यांचीच भूमिका साकारायचो. असा माझा कल हळूहळू अभिनयाकडे वळायला लागला”, असे अभिनय क्षेत्राकडे कसे वळले याबद्दल अजिंक्य यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “चित्रपटसृष्टीतील माझे गुरु हे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त होते. आमचे घरचे संबंध जरी असले तरी त्यांनी माझ्यातील कला ओळखून नकळतपणे माझ्यातील कॅमेऱ्याची भीती घालवली आणि अर्धांगी हा माझा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला”, असा पहिल्या वहिल्या चित्रपटाचा त्यांनी अनुभव सांगितला.