हवामान आणि वातावरण बदल ही अवघ्या जगाला भेडसावणारी एक जटील समस्या. मोठ्या प्रमाणावर वाढलेले प्रदूषण त्याचे प्रकार, त्यामुळे विस्कळीत होणारा अधिवास, वाढती रोगराई आणि एकंदरच परिसंस्थेची विस्कटलेली घडी हे सगळं चक्र सातत्याने सुरूच आहे. प्लास्टिक प्रदूषण, मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनिप्रदूषण अशा अनेक प्रकारांचा समावेश होत असून, प्लास्टिकही त्यातल्या त्यात एक गंभीर समस्या. कपडे आणि फॅशन ही प्रदूषण निर्माण करणारी एक मोठी इंडस्ट्री बनत असतानाच, त्यामध्ये आता सौंदर्य प्रसाधनाच्या कंपन्यांचीही भर पडलेली दिसते.
सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये मायक्रोप्लास्टिक अर्थात प्लास्टिकचे सूक्ष्म कण वापरले जात असल्याचे काही अहवालांमधून समोर आले आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये किंवा टॉयलेटरीज म्हणून गणली जाणारी प्रसाधने जसे की साबण, शॅम्पू, टूथपेस्ट इत्यादी वस्तूंमध्येही मायक्रो प्लास्टिकचा वापर केला जातो. शॅम्पू, लिपस्टिक, फाऊंडेशन अशा प्रसाधनांमध्ये चमक (ग्लिटर) दिसण्यासाठी अशाचप्रकारच्या मायक्रोप्लास्टिकचा वापर केला जातो.
प्लास्टिक हा घटक अविघटनशी आहे. त्यामुळे प्रसाधनांचा वापर केल्यानंतर हे सूक्ष्म प्लास्टिकचे कण पाण्याद्वारे नदी, तलाव, समुद्रामध्ये जातात. अशाप्रकारे समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये जाणारे मायक्रोप्लास्टिक तेथील अधिवासावर तसेच परिसंस्थेतील घटकांवर अपायकारक परिणाम करणे सुरू करते. मासे, कासवं किंवा अशा प्रकारच्या अनेक जीवांमध्ये प्लास्टिकचे अवशेष सापडल्याचीही उदाहरणे आहेत. हे प्लास्टिकचे कण त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम करणारे, प्रसंगी जीवघेणे ठरणारे असतात.
तसेच, समुद्रातील मासे आपण खातो, त्यामुळेच हे सूक्ष्म प्लास्टिकचे कण आपल्याही शरीरात जातात. तसेच वापरले जाणार्या सौंदर्य प्रसाधनांचा थेट संबंध आपल्या त्वचेशी येत असल्यामुळे त्याचेही परिणाम त्वचेवर झाल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ हे मायक्रोप्लास्टिक आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करत असून, या विळख्याचे आपणही बळी ठरलो आहोत. काही दिवसांपूर्वी एका नवजात बाळाच्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळल्याचे वृत्त झळकले होते. धक्कादायक म्हणजे, अगदी मानवी मेंदूमध्येही या मायक्रो प्लास्टिकने शिरकाव केला आहे. यामुळे रक्ताचा कर्करोग, अल्झायमर, पार्किन्सन्स अशा अनेक आजारांना हे मायक्रोप्लास्टिक कारणीभूत ठरते.
समुद्रामध्ये येणारे प्लास्टिकचे लोट दिवसेंदिवस वाढतच असून, त्यामध्येही घर्षण निर्माण होऊन त्याचेही मोठ्या प्रमाणात सूक्ष्म प्लास्टिकमध्ये रूपांतर होते. हेच सूक्ष्म प्लास्टिक समुद्रतळामध्येही (डशरलशवी) आढळले आहेत. केवळ समुद्रामध्ये आढळणार्या सस्तन प्राण्यांमध्येच नाही, तर प्रवाळे व इतर परिसंस्थेमध्ये ते आढळले आहेत. पृथ्वीवरील कुठलाच भाग मायक्रोप्लास्टिकच्या विळख्यातून वाचू शकलेला नाही, ही अधिक चिंतेची बाब आहे.
या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत ‘क्लिन सी कॅम्पेन’ ही राबविण्यात आले. ‘क्लिन सी कॅम्पेन’च्याच अधिकृत संकेतस्थळावर जगभरातील समुद्रामध्ये ५१ ट्रिलियन इतकं मायक्रोप्लास्टिक असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २०१७ पासून सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये आजवर ६९ देश सहभागी झाले असून, आठ देशांनी याबाबत कायदेही केले आहेत.
आपण यासाठी काय करू शकतो? सौंदर्य प्रसाधने किंवा इतर कुठल्याही वस्तू विकत घेताना त्यांची सजगपणे निवड करायला हवी. प्रसाधनांच्या मागे त्यामध्ये वापरले जाणार्या घटकांची यादी दिलेली असते. या यादीमध्ये पॉलिइथिलीन, पॉलीप्रॉपिलीन इ. अशा घटकांचा समावेश असल्यास, त्यामध्ये मायक्रोप्लास्टिकचा समावेश आहे, हे लक्षात घेत ही प्रसाधने नाकारायला हवीत. त्याऐवजी, नैसर्गिक वस्तूंचा वापर केलेल्या पर्यायांची निवड करायला हवी.
आपल्या दैनंदिन वापरामध्ये प्लास्टिकच्या राक्षसाचा शिरकाव अगदी बेमालूमपणे झाला असून, त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. गतवर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे ‘बिट प्लास्टिक पोल्यूशन’ या संकल्पनेवर आधारित कृती योजनांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होणे गरजेेचे आहे. सुज्ञपणे आणि गरजेपुरतीच वस्तूंची योग्य खरेदी हेच पृथ्वीला या विळख्यातून वाचवू शकेल!