रात्रीस खेळ चाले! उबाठा गटाचा बडा नेता मध्यरात्री शिवसेनेत

06 May 2024 12:35:14
 
Shinde & Thackeray
 
नाशिक : उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविवारी रात्री उशीरा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
राज्यभरात लोकसभा निवडणूका सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  पीयुष गोयल यांच्या प्रचार रॅलीत 'जय श्रीराम' चा जयघोष! नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 
यावेळी बोलताना विजय करंजकर म्हणाले की, "गेली १२ वर्षे शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला होता, मात्र लोकसभेची उमेदवारी देण्याच्या शेवटच्या दिवशी माझे तिकीट कापण्यात आले. काही लोकांच्या सांगण्यावरून हे करण्यात आलं आहे. उबाठा गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरी प्रत्यक्षात या गटातीलच दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचं वाटोळं केलं आहे. तिकडे मला न्याय न मिळाल्याने आता वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे," असे ते म्हणाले.
 
दरम्यान, यावेळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक भगवान ओशेटे, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, इगतपुरी पंचायत समिती सभापती रंगनाथ कचरे, इगतपुरी युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तसेच भगूर, इगतपुरी, शिरसाळे विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0