कोकणात भाजप महायुतीचीच सरशी होणार : रवींद्र चव्हाण

06 May 2024 17:52:17

Ravindra Chavhan 
 
कल्याण : महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकून महायुतीचे सरकार आणण्यात विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय कोकणात पक्षाची पाळेमुळे रोवण्यासह अनेक विकासकामे करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. कोकणातील लोकसभा मतदारसंघांमध्ये ते विशेष लक्ष घालून निवडणुकीसाठी झोकून काम करत आहेत. तसेच नगर जिल्ह्यातही ते समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु, त्यांचे होमग्राऊंड असलेल्या कोकणात भाजप महायुतीची कशी वाटचाल सुरू आहे. याबाबत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी केलेली बातचीत.
 
आपण डोंबिवलीचे आमदार आहात आणि लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचा मुलगा उभा आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते उभे आहेत. त्यात तुमच्याकडे नगरची जबाबदारी दिली आहे. निवडणुकीला थोडेच दिवस आहेत तर कसा वेळ देत आहात?
 
कोकणात वर्षानुवर्षे काम करताना बराचसा प्रवास झाला आहे. निवडणुकीत महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकत्र मोट बांधली आहे. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते प्रचारात झोकून काम करत असल्याने निवडणूक सोपी झाली आहे. त्यामुळे नक्कीच येथे महायुतीची सरशी होईल.
 
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत निवडून आले होते. आता परिस्थिती वेगळी आहे. नारायण राणे उमेदवार आहेत. यंदाच्या निवडणुकीत तुमचे नाव चर्चेत होते. पण, तुम्ही स्वत: जबाबदारी नाकारली का?
 
भाजपमध्ये सर्व निर्णय संसदीय बोर्ड घेत असते. त्यामुळे एखाद्या मतदारसंघातील जबाबदारी आणि उमेदवारी संसदीय बोर्ड ठरवते. कोकण आणि त्याठिकाणाचा सर्वांगीण विकास किंवा गेली चाळीस वर्षे त्या भागात नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची एक वेगळी छाप आहे. कोकणातील समस्यांचा त्यांना अभ्यास आहे. राणे यांचा कोकणातील जनसंपर्क दांडगा आहे. राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सर्व महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.
 
कोकण म्हटलं की पर्यटन क्षेत्र असं चित्र समोर येते. आजवरच्या राज्यकर्त्यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न दाखविले होते. पण आजतागायत पूर्ण झाले नाही. तुम्ही सिंधुदुर्गात फिश थिक पार्क उघडले त्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल? काही उपाययोजना आहेत का?
 
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. कोकणचा विकास झाला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पर्यटनासाठी रस्त्यांचे जाळे विस्तारणे गरजेचे आहे. पर्यटनस्थळे विकसित होणे आवश्यक आहे. मध्यंतरीच्या काळात काही पर्यटनस्थळे नव्याने उदयास आली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पर्यटनस्थळांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यास सुरूवात झाली आहे. सर्जेकोटसारख्या किल्ल्यांची दुरुस्ती करून त्याला पुनरुज्जीवित करणे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झाले आहे. कोकणातील ३६ किल्ले पुनरुज्जीवित करण्याचा एक वेगळा विचार सरकारने केला आहे. येत्या काळात या कामाला गती मिळेल. सिंधुदुर्गमध्ये माझ्या संकल्पनेतून फिश थीक पार्क तयार केले आहे. एका फेजचे काम झाले आहे. एका फेजचे काम अद्याप बाकी आहे. सिंगापूरच्या धर्तीवर काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक ते दीड हजाराहून अधिक पर्यटक येथे येत असतात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना धार्मिकदृष्टया आगळे महत्त्व आहे. तेथील जत्रा, सर्व कला जपण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे कोकणात पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ आहे.
 
गणेशोत्सवात मुंबई-गोवा हायवे विषय खूप गाजला. यातील बरेचसे काम बाकी आहे? तुमच्या पुढाकाराने मुंबईवरून गोव्याकडे जाणारा भुयारी मार्ग चालू झाला पण तो अधूनमधून बंद असतो. दुसरा भुयारी मार्ग अद्याप चालू झालेला नाही. त्याला जोडून एक प्रश्न आहे रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाबाबत डोंबिवलीत एक कोकणवासीयांचा मेळावा भरला होता. त्यात तुम्ही त्यांना आश्वासन देत दिलासा दिला होता. या आश्वासनांची पूर्ती कुठपर्यंत आली आहे?
 
मुंबई-गोवा हायवे हा लवकरात लवकर पूर्ण होणे कोकणवासीयांची मागणी होती. हा प्रकल्प नॅशनल हायवेचा आहे. पण महाराष्ट्रातील प्रकल्प असल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री या नात्याने या प्रकल्पात पुढाकार घेऊन एक लेन कोकणवासीयांना सुरू करून देईन, असे आश्वासन दिले होते. एक लेनचे काम पूर्णत्वास आले आहे. दुसर्‍या लेनचे काम मे अखेर पर्यंत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण होणार आहे. ब्रीजचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याने काम न केल्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकले आहे. या कामांची प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभरात हा महामार्ग नागरिकांना वापरासाठी खुला होईल. ब्रीज झाल्यावर अप्रोच रोड चांगल्या स्थितीत करण्यात आले आहेत.
 
देशात चेरापुंजी नंतर सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. पण कोकणात आजही विहीरी कोरड्या पडतात. पावसाचे पाणी अडवून छोटे-मोठे बंधारे बांधण्याची योजना आहे का? तसेच त्या पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासारखे काही प्रकल्प आहे का?
 
कोकणात अनेक ठिकाणी पाणी साठवा आणि पाणी जिरवा या अंतर्गत छोटी धरणे तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाझर तलाव प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. महाड, पोलादपूर याठिकाणाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाला यश आले आहे.
 
भविष्यात तुमच्याकडे कोकणचे आमदार किंवा खासदार म्हणून पाहिले जाते? कोकणचे भावी भाग्यविधाता म्हणून पाहिले जाते. कोकणात रमाल की डोंबिवलीत?
 
पालघर ते सिंधुदुर्ग या परिसराला कोकण म्हणून ओळखले जाते. या पालघरपासून सिंधुदुर्गात सोयी-सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. रोजगार संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. या भागातील संघटनात्मक दृष्टीकोनातून विविध प्रश्नांवर पाठपुरावा करत असतो. या परिसरात चांगले वातावरण महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून दिसत आहे. कोकणातील सर्व जिल्हयात सार्वजनिक बांधकाम विभागातून मोठया प्रमाणावर निधी दिला आहे. सिंधुदुर्गात ही साडे पाच हजार कोटी, रत्नागिरीश्र साडे पाच हजार कोटी रुपये निधी दिला आहे. आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय असावे असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानुसार कामाला सुरूवात देखील झाली आहे. पालघर, रत्नागिरीमधील, रायगड मधील वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग मधील वैद्यकीय महाविद्यालय दीड वर्षात पूर्ण होतील अशा पद्घतीने काम सुरू आहे. टाईम बॉन्ड काळात या सर्व गोष्टी पूर्ण व्हाव्यात यासाठी जातीने लक्ष घातले जात आहे. आरोग्याची व्यवस्था सदृढ करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. कोविड काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला होता. भविष्यात अशी काही आपत्ती आल्यास त्यांचा त्रास होणार नाही. रोजगार प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे यासाठी ‘फंट्र अ‍ॅण्ड इन्वेसमेंट’ यासारखे काही प्रकल्प तयार करण्यात येत आहेत. दोडामार्ग, रायगड येथील काही प्रकल्प पुन्हा सुरू करता येतील का हे पाहिले जात आहे.
 
कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता असं म्हटले जाते. पण गेल्या दशकात आपण येथे पक्षवाढीसाठी विशेष योगदान दिले आहे. नगरपालिका, नगरपरिषद येथे सत्ता आणण्याबरोबरच तुम्ही पक्ष मजबूत केला. आपण स्वत: डोंबिवली मतदारसंघाचे आमदार आहात. तर कोकण आणि डोंबिवली यात तुम्ही मेळ कसा साधता?
 
पक्षाने कोकणाची संघटनात्मक जबाबदारी दिल्यावर सातत्याने या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे. तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे. त्या सोडविण्यासाठी त्याठिकाणी प्रवास करणे. या सगळ्या गोष्टी कामाचा भाग म्हणून करत असतो. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविता आले, तर त्याचा वेगळा आनंद मिळतो, समाधान मिळते. आपल्याच मतदारसंघा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समस्या असतात. त्यातून अनुभव मिळतो आणि लोकांकडून सोल्युशन मिळत असते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0