मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीचे भाजप उमेदवार पीयूष गोयल यांची प्रचार रॅली काढण्यात आली असून या रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, तसेच यावेळी नागरिकांनी पीयुष गोयल यांच्या समर्थनार्थ 'जय श्रीराम'चा जयघोषही केला.
येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पीयुष गोयल यांची प्रचार रॅली काढण्यात आली. एस. एन. दुबे रोड जवळील हनुमान मंदिरात बजरंगबलीचे दर्शन घेऊन पीयुष गोयल यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली. ठिकठिकाणी प्रचार रॅलीच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत पुष्पहार घालून पीयुष गोयल यांचे नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
ज्ञानेश्वर नगर, कोंकणीपाडा, सूर्योदय सोसायटी, कामत हॉटेल, विद्याभूषण शाळा, मारुती मंदिर, श्रीनाथ नगर, वीरसावरकर नगर, महिंद्रा नेन्सी कॉटेज, या ठिकाणाहून ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या प्रचार रॅलीची शांतीवन बोरिवली (पूर्व) येथे सांगता झाली. याप्रसंगी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.